रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (10:30 IST)

गोमांस खाल्ल्याचा आरोपावरून हरियाणात मजुराची बेदम मारहाण करत हत्या, कचरा वेचायचे काम करायचा पीडित

murder
हरियाणात कचरा गोळा करणाऱ्या एका व्यक्तीची गोमांस शिजवून खाल्ल्याच्या संशयातून कथितरित्या बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. मूळच्या पश्चिम बंगालमधील या व्यक्तीला गोरक्षा दलाच्या काही जणांनी मारहाण केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
 
ही घटना 27 ऑगस्ट रोजी दिल्लीपासून जवळपास 150 किमीवरील चरखी दादरीच्या बाढडा भागात घडली.
 
मृत व्यक्तीचं नाव साबीर मलिक असून तो त्याच्या कुटुंबासह चरखी दादरी येथे एका झोपडपट्टीत राहायचा. साबीर मूळचा पश्चिम बंगालमधील परगणा जिल्ह्याचा रहिवासी आहे.
 
याप्रकरणी पोलिसांनी 29 ऑगस्ट रोजी सात जणांना अटक केली असून यातील 2 जण अल्पवयीन आहेत.
 
या घटनेचा व्हिडीओ हा 31 ऑगस्टला व्हायरल झाला. यात काही तरुण पीडिताला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे.
 
श्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला भेटून नुकसानभरपाई देण्याच्या सूचना दिल्या.
 
हरियाणाचे मुख्यमंत्री नयाब सैनी यांनीही घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत संवेदना व्यक्त केल्या. गोमातेविषयी गावातील लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि त्यांचा सम्मान करायला हवा, असं ते म्हणाले.
 
तर, नूह येथील काँग्रेस आमदार आफताब अहमद यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. हरियाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक नसल्याचं ते म्हणाले. कचरा गोळा करणाऱ्या गरिबाचा अशाप्रकारे बळी घेणं चिंताजनक आहे. घटना घडून 5 दिवस झाल्यानंतर ती समोर आली. एवढा वेळ का लागला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
नेमकं काय घडलं?
गोरक्षा दलाच्या काही जणांना बाढडा बस स्थानकासमोर असलेल्या मुस्लीम वस्तीतील लोकं गोमांस सेवन करत असल्याचा संशय आला.
 
गोरक्षा दलाचे काही सदस्य 27 ऑगस्ट रोजी या झोपडपट्टीत गेले आणि तिथल्या लोकांची चौकशी करू लागले. त्यावेळी, एका भांड्यात ठेवलेल्या मांसाच्या टुकड्यावरून त्यांना ते बीफ (गोमांस) असल्याची शंका आली. त्यांनी झोपडीतील शबरुद्दीन नावाच्या माणसाला याबाबत विचारणा सुरू केली.
 
घटनेचा व्हिडीओही तयार केला. त्यात त्याठिकाणी असलेलं मांस गोमांस असल्याचा दावा करण्यात आला. पण, ते गोमांस नसून म्हशीचं मांस असल्याचं शबरुद्दीन म्हणाले. तसंच त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करत त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
 
पण, त्या सर्वांनी शबरुद्दीन यांना पकडून ते गो मांस असल्याचं कॅमेऱ्यापुढं कबूल करण्यास भाग पाडलं. त्यानंतर या गोरक्षा दलाच्या सदस्यांनी याबाबत बाढडा पोलिसांनाही कळवलं. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मांसाच्या त्या तुकड्यासह काही जणांना ताब्यात घेतलं.
 
एफआयआरमध्ये काय?
तक्रारकर्ते सजाउद्दीन सरदार यांनी सांगितलं की, त्यांचं लग्न साबीर मलिक यांची बहीण शकीनाशी झालं आहे. ते बाढडाच्या जुई रोडवरील झोपडपट्टीत राहतात आणि कचरा वेचण्याचं काम करतात.
 
“27 ऑगस्ट रोजी काही लोकं मला आणि माझ्या बरोबर कचरा गोळा करणाऱ्या लोकांना म्हणाले की, तुम्ही मंगळवारच्या दिवशी मांस खाता, हे गोमांस तर नाही ना? असं म्हणत ते आम्हाला बाढडा पोलीस ठाण्यात घेऊन गेले."
 
"तर काही जणांनी साबीरला बरोबर नेले. बस स्थानकावरून कचरा आणण्याचा बहाणा त्यांनी केला. साबीरप्रमाणेच त्यांनी असिरुद्दीन यांनाही बस स्थानकावर बोलावलं आणि त्या चार-पाच जणांनी मिळून साबीर आणि असिरुद्दीन दोघांनाही बेदम मारहाण केली.
 
त्यानंतर दुचाकीवर बसवून त्यांना घेऊन गेले. साबीर आणि असिरुद्दीन यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचा व्हीडिओ मी पाहिला आहे,” असंही सजाउद्दीन म्हणाले.
 
गोरक्षा दलाच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन झोपडपट्टीत राहणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास दबाव टाकला. त्यानंतर त्याच दिवशी (27 ऑगस्ट) रात्री साबीरचा मृतदेह भांडवा गावाजवळ आढळून आला.
 
बाढडा पोलिसांनी 28 ऑगस्ट रोजी साबीरचा मेहुणा सजाउद्दीन सरदार यांच्या तक्रारीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघे अल्पवयीन आहेत.
 
आरोपींविरोधात हत्येची कलमं दाखल केली आहेत. त्यात भारतीय न्याय संहितेच्या 190, 191(3), 115(2), 140(1), 103(1), 61(2) या कलमांचा समावेश आहे.
 
भीतीचं वातावरण
या मुद्द्यावर माध्यमांनी झोपडपट्टीतील रहिवाशांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, हे रहिवासी दहशतीत आहेत. एवढंच नाही तर ते तिथून स्थलांतरण करण्याच्या विचारात असल्याचंही म्हणाले.
 
घटनेनंतर पोलिसांनी या भागात सुरक्षा वाढवली आहे, तरीही लोकांमध्ये दहशत कायम आहे. गोमांसाच्या मुद्द्यावर इथं कोणीही बोलण्यास तयार नाही. 30 ऑगस्टला येथील रहिवाशी दादरी सोडून पश्चिम बंगालला परतण्याच्या तयारीत होते, यावेळी पोलिसांनी त्यांना सुरक्षा प्रदान केली.
 
पोलीस काय म्हणाले?
पोलीस उपअधीक्षक भारत भूषण म्हणाले की, ही घटना 27 ऑगस्टच्या रात्री घडली. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी गुन्हा दाखल करत सात जणांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींत दोन अल्पवयीनांचा समावेश आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 
या दोन अल्पवयीनांना सोडून इतर आरोपी कोठडीत आहेत. याव्यतिरिक्त इतर काही नावं समोर आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही पोलिसांनी म्हटलं.
 
दादरीच्या पोलीस प्रमुख पुजा वशिष्ठ यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून झोपडपट्टीत सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Published By- Dhanashri Naik