शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 15 जानेवारी 2023 (13:41 IST)

ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर, कोव्हिड आणि न्युमोनियाची लागण

lalit modi
इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना न्युमोनिया आणि कोव्हिड-19 ची लागण झालीय. त्यांच्यावर लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना ठेवण्यात आलंय. ललित मोदी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या आजाराची माहिती देण्यात आलीय.
 
ललित मोदींनी इन्स्टाग्रामवर लंडनच्या ल्युटोन एअरपोर्टवर पोहोचले असतानाचा फोटो शेअर केलाय. या फोटोसोबत पोस्टमध्ये लिहिलंय की, "न्युमोनिया आणि कोव्हिडची लागण झालीय. ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलंय. उपचारासाठी मेक्सिकोहून लंडनला हलवण्यात आलंय."
 
"डबल कोव्हिड, इन्फ्लुएंजा आणि डीम न्युमोनियामुळे तीन आठवड्यांपासून अंथरूणाला खिळून आहे. उपचारासाठी मेक्सिकोच्या बाहेर जाण्याच्या अनेक प्रयत्नांअंती एअर अॅम्ब्युलन्स आणि दोन डॉक्टरांसोबत लंडनला पोहोचतोय," असं ललित मोदींनी पोस्टमध्ये म्हटलंय.
ललित मोदींनी लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यानचाही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
 
“माझ्या रक्षणकर्त्या दोन डॉक्टरांबरोबर. या दोघांनी तीन आठवडे माझ्या प्रकृतीची सर्वतोपरी काळजी घेतली, उपचार केले. अक्षरक्ष: रात्रंदिवस. मेक्सिकोतल्या एका शहरातले हे डॉक्टर आहेत तर दुसरे माझे लंडनमधले डॉक्टर जे माझ्यासाठी मेक्सिकोत आले. मला लंडनला पुन्हा सुखरुप याता यावं यासाठी ते आले. या दुर्धर प्रसंगातून मला बाहेर काढण्यासाठी या दोघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण तरी मला अजून पूर्ण बरं व्हायला वेळ लागेल. सध्या 24 तास ऑक्सिजन सपोर्टवर आहे. माझी मुलं, त्यांचा मित्रपरिवार, माझा जिवलग मित्र हरीश साळवे यांना मला संकटातून बाहेर काढलं. ते माझ्या कुटुंबासारखेच आहेत, किंबहुना माझ्या आयुष्याचाच ते भाग झालेत. देव त्यांचं भलं करो, जय हिंद. व्हिस्ताजेट कंपनीच्या क्रू मेंबर्सचेही आभार. त्यांनी कर्तव्यापल्याड जात मला सुखरुप आणण्यासाठी प्रयत्न केले. थॉमसफ्लोरव्हिस्टा, मित्रा मनापासून आभारी आहे”, असं ललित मोदी यांनी म्हटलं आहे.
 
ललित मोदी इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात आयपीएल स्पर्धेचं आयोजन सुरू झालं. 2005 ते 2010 पर्यंत ते बीसीसीआयचे उपाध्यक्षही होते.
ललित मोदींनी लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यानचाही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ललित मोदी इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात आयपीएल स्पर्धेचं आयोजन सुरू झालं. 2005 ते 2010 पर्यंत ते बीसीसीआयचे उपाध्यक्षही होते.
ललित मोदी हे अनेकदा वादात अडकले आहेत. त्यांच्या वादग्रस्त कारकीर्दीवर टाकलेली एक नजर.
 
ललित मोदी कोणत्या वादात अडकले होते?
सर्वांत पहिल्यांदा ललित मोदी राष्ट्रीय बातम्यांमध्ये झळकले जेव्हा ते 2005 मध्ये अचानकपणे राजस्थान क्रिकेट संघाचे अध्यक्ष बनले. त्यावेळी भाजपची राजस्थानमध्ये सत्ता आली आणि त्यानंतर लगेचच ते क्रिकेट संघाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष बनले.
 
2008 मध्ये त्यांनी आयपीएलची सुरुवात केली होती. ते आयपीएलचे पहिले कमिश्नर बनले. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट लीग असा आयपीएलचा नावलौकिक बनला.
2010 मध्ये नव्याने तयार करण्यात आलेली कोची टस्कर्स या टीमच्या मालकांचे प्रारूप ट्वीट द्वारे उघड केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. कोची टस्कर्सच्या मालकांची नाराजी त्यांनी यामुळे ओढावून घेतली होती. या टीम मालकांपैकी एक नाव सुनंदा पुष्कर यांचे देखील होते. सुनंदा या तत्काली परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी होत्या. यानंतर शशी थरूर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
 
त्यानंतर आयपीएलमध्ये एकामागून एक भ्रष्टाचाराबाबत आरोपांच्या फैरी झडल्या. तसेच आयपीएलच्या प्रसरण हक्कांवरून देखील वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा देखील ठपका होता, त्यांनी हे आरोप फेटाळले होते.
 
2013 मध्ये बीसीसीआयने त्यांच्यावर नेहमीसाठी बंदी घातली
ललित कुमार मोदींमुळे माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या देखील वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. ललित मोदींना ट्रॅव्हल डॉक्युमेंट उपलब्ध करून देण्यासाठी सुषमा स्वराज यांनी मदत केली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

Published By - Priya Dixit