बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जून 2019 (09:36 IST)

आता पाऊस येणार, पाऊस पडणार

मुंबईसह राज्यात शुक्रवारपासून अर्थात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील किमान तीन ते चार दिवस किनारपट्टीवर सर्वदूर पाऊस असेल, असा अंदाज आहे. 
 
सध्या कोकण किनारपट्टीच्या जवळ चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून सध्याचा पाऊस या अनुकूल स्थितीमुळे पडत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार १ जुलैपर्यंत कोकणामध्ये सर्वदूर पाऊस असेल. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडेल. मात्र, उत्तर मध्य महाराष्ट्रात ३० जून आणि १ जुलैला थोड्याच ठिकाणी पाऊस असेल. मराठवाड्यातही पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात दोन दिवसानंतर अनेक ठिकाणी पावसाचा अनुभव घेता येईल. शुक्रवारी आणि शनिवारी पालघर, ठाणेसह मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार सरींचीही शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यामध्येही शुक्रवार, शनिवारी एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. ही स्थिती ओसरल्यानंतर बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या स्थितीवर जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस राज्याच्या अंतर्भागात होणारा पाऊस अवलंबून आहे. ते ओरिसामधून आत येण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ वायव्य दिशेने गेले तर मध्य भारतात पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला याचा फायदा होऊ शकतो. मात्र हे उत्तर दिशेने गेले तर त्याचा फायदा महाराष्ट्राला होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.