बँकाच्या वेळापत्रकात १ नोव्हेंबरपासून होणार बदल होतोय, नोंद करून घ्या
सणासुदीचे दिवस संपले असून यामुळे आता बँकांच्या वेळेत बदल होणार आहे. देशातील अनेक बँकांचे १ नोव्हेंबरपासून वेळेत बदल होऊन नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पब्लिक सेक्टरच्या बँकांचं नवीन वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे. आता बँका एकाच वेळेत उघडणार असून एकाच वेळी बंदही होणार आहेत.
एकाच भागात वेग-वेगळ्या बँकांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या होत्या. अर्थ मंत्रालयाने बँकांच्या कामकाजाच्या वेळा एकसमान करण्याचे आदेश दिले होते. नव्या वेळापत्रकानुसार, आता निवासी भागात बँका सकाळी ९ वाजता सुरु होणार असून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कामकाज चालणार आहे. तर काही बँकांमध्ये सकाळी ९ ते ३ पर्यंत काम सुरु राहणार आहे.
बँकांमध्ये कमर्शियल अॅक्टिव्हिटीचा वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत असेल. तर काही बँकांमध्ये ही वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. काही भागात सकाळी १० ते ५ पर्यंत कामकाज सुरु राहणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग डिव्हिजनने सर्व बँकांशी चर्चा केल्यानंतर, बँकांच्या शाखा ग्राहकांच्या सोयीनुसार उघडल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बँकांमध्ये तीन प्रकारचं वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे.