बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (16:22 IST)

उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख मंत्री उद्या (८ जून रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान मराठा आरक्षण यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे.
 
 या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार आहे.