बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (09:19 IST)

उत्तरकाशी बोगद्यात 15 मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग, अजून किती खोदकाम करावं लागणार?

uttarkashi tunnel
उत्तरकाशी येथील सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी डोंगर माथ्यावरून व्हर्टिकल ड्रिलिंग म्हणजेच उभं ड्रिलिंग सुरू करण्यात आलं आहे. त्याचवेळी बोगद्यात पडलेल्या ढिगाऱ्याच्या आतून सुरू असलेलं खोदकाम थांबवण्यात आलं आहे.
 
हैदराबादहून आणलेल्या प्लाझ्मा मशीनद्वारे काम सुरू केलं असून आत अडकलेला ऑगर मशीनचा एक भाग कापून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याविषयी बोगद्याबाहेर पत्रकार परिषद आयोजित करून माहिती देण्यात आली. यावेळी उत्तराखंड सरकारचे सचिव आणि या ऑपरेशनचे नोडल अधिकारी नीरज खैरवाल आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव महमूद अहमद उपस्थित होते.
 
नीरज खैरवाल म्हणाले, "आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत ऑगर मशीनचे अडकलेले ब्लेड कापून बाहेर काढणे अपेक्षित आहे."
 
महमूद अहमद म्हणाले, "आम्ही कालपासून आणखीन 2-3 पर्यायांवर काम सुरू केलं आहे. आम्ही एसजेव्हीएनएल ला 1-1.2 मीटर व्यासाचं व्हर्टीकल ड्रिलिंग करायला सांगितलं आहे."
 
ते म्हणाले की, "आम्ही आमच्या भूगर्भशास्त्रज्ञांसोबत काही ठिकाणं शोधून काढली आहेत जिथे ड्रिलिंग आणखीन चांगलं होऊ शकतं. आतापर्यंत सुमारे 15 मीटर खोदकाम पूर्ण झालं आहे. आमचा अंदाज आहे की एकूण 86 मीटर ड्रिलिंग करावं लागेल. येत्या दोन दिवसांत ते पूर्ण होईल."
 
बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने आडवं खोदकाम करण्याबाबत महमूद अहमद म्हणाले की, हे काम दोन दिवसांनी म्हणजेच 28 नोव्हेंबरपासून सुरू होईल.
 
ते म्हणाले, "ही एक मोठी प्रक्रिया आहे. आडवं ड्रिलिंग यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे 15 दिवसांची मुदत आहे. जर ते 180 मीटर अंतरावर असेल, तर आम्ही दररोज 12 मीटर वेगाने काम करू. आम्हाला एक ड्रिफ्ट टनेल बांधायचा आहे, त्याचं डिझाईन तयार झालं आहे आणि त्याला मंजुरीही मिळाली आहे."
 
उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू असून त्यांना लवकरच बाहेर काढले जाईल अशी आशा व्यक्त केली जातेय.
 
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं की, बोगद्यात अडकलेल्या मजुरांना काढण्यासाठी हैदराबादहून प्लाझ्मा मशीन मागवले आहे.
 
शनिवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळपर्यंत हे मशीन वापरले जाण्याची शक्यता आहे.
 
ते म्हणाले की, ऑगर मशीन तुटल्यानंतर प्लाझ्मा मशीनद्वारे ड्रिलिंग केले जाईल. त्याद्वारे एका तासात चार मीटपर्यंत खोदकाम करता येते.
 
प्लाझ्मा मशीनद्वारे काम सुरू केल्यानंतर मजुरांना काही तासांमध्ये बाहेर काढले जाईल, असा दावा त्यांनी केला.
 
धामी यांच्या मते, बोगद्यातील मजुरांना काढण्यासाठी सर्व पर्यायांवर काम केलं जात आहे. त्यासाठी व्हर्टिकल ड्रिलिंगचं कामही सुरू करण्यात आलं आहे.
 
हे ऑपरेशन लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी इच्छा असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानही याबाबत काळजीत आहेत.
 
"केंद्रीय संस्था, राज्य सरकार आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची पथकं मजुरांना बाहेर काढण्याच्या या मोहिमेत एकत्रितपणे काम करत आहेत. आम्ही लवकरच यशस्वीरित्या सर्वांना बाहेर काढण्यात यश मिळवू," असं धामी म्हणाले.
मुख्यमंत्री धामी यांनी दिलेल्या माहितीनुसार , त्याठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. पण तरी गरज लागेल ते लगेचच मागवले जात आहे.
 
वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, बोगद्याच्या बाहेर काही अंतरावरच 10 बेडचे हॉस्पिटल, 40 अॅम्ब्युलन्स, 20 डॉक्टर आणि 35-40 सपोर्ट स्टाफ सज्ज आहेत. तर सुमारे 50 किलोमीटर अंतरावर 41 बेडचं एक रुग्णालय तयार करण्यात आलं आहे.
 
बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी सुरू असलेल्या मदतकार्याचा शनिवार (25 नोव्हेंबर) हा 14 वा दिवस आहे.
 
शनिवारी (25 नोव्हेंबर) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद हसनैन यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, "उत्तरकाशी बोगद्यातून 41 कामगारांना काढायला आणखी किती वेळ लागेल हे ठामपणे सांगता येणार नाही. हिमालयातला डोंगर फोडताना अनेक अडचणी येतात. जसं युद्ध सुरू झाल्यावर ते कधी संपेल हे सांगता येत नाही. तसंच हे काम आहे. "
 
त्याआधी मदतकार्याच्या 12 व्या दिवशीच कामगारांपर्यंत पोहोचू असं सरकारने सांगितलं होतं. पण मार्गात काही अडथळे आल्याने कामाचा वेग मंदावला.
 
12 नोव्हेंबर रोजी बोगदा कोसळल्याने 41 मजूर त्यात अडकले आहेत. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
 
गुरुवारी मोहीम पूर्ण झाली असती पण...
महमूद अहमद यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गुरुवारीच (23 नोव्हेंबर) कामगारांना बाहेर काढले जाईल, अशी आशा होती परंतु अडचणींमुळे तसे होऊ शकले नाही.
 
बचाव मोहिमेदरम्यान टीमला ढिगाऱ्यात एक धातूचा पाइप सापडला त्यामुळे पुढे जाणे शक्य नव्हते.
 
त्यांनी सांगितले की, "गुरुवारी 1.8 मीटरपर्यंत आत गेल्यावर बोगद्याच्या छतावरील पाईप अडथळा म्हणून आढळला. यामुळे आम्ही ऑगर मशीन पुन्हा आणून काम करावे लागले.
 
सिलक्यारा बोगद्याच्या बचाव कार्यात गुंतलेले उत्तराखंड सरकारचे सचिव नीरज खैरवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, बचाव कार्य वेगाने सुरू आहे. पण पाईप खराब झाल्यामुळे कामाची गती मंदावली आहे.
 
गुरुवारी बोगद्याच्या आत 1.8 मीटरचा पाइप टाकण्यात आला होता, पण जागेअभावी पाइप पुढे जाऊ शकला नाही आणि पाईपचा 1.2 मीटरचा भाग कापावा लागला. औगर मशीन व्यवस्थित काम करत आहे.
 
बचावकार्य करणारी टीम किती दूर पोहोचली?
बोगद्यात किती अंतरापर्यंत बचाव कर्मचारी पोहोचू शकले आहेत, याची माहिती देताना सय्यद हसनैन म्हणाले, “बोगद्यात आम्ही 48 मीटर पुढे पोहोचलो होतो. पण पाईप वाकल्यामुळे त्यातील 1.2 मीटर भाग कापावा लागला. सध्या आम्ही बोगद्यात 46.8 मीटरपर्यंत पोहोचलो आहोत."
 
शुक्रवारी सकाळपासूनच डॉक्टरांचे पथक आणि डझनभर लाइफ सपोर्ट सिस्टिमसह रुग्णवाहिका बोगद्याच्या बाहेर सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
 
मंगळवारी बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये सर्व कामगार सुरक्षित दिसत होते.
 
अन्नासोबतच त्यांच्यामध्ये लाइफ सपोर्ट पाईपद्वारे कॅमेरा पाठवण्यात आला आहे, जेणेकरून त्यांच्याबद्दलची माहिती मिळू शकेल.
 
बचाव कार्य अंतिम टप्प्यात
याआधी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, बचाव कार्य अंतिम टप्प्यात आहे.
 
हे ऑपरेशन लवकरात लवकर पूर्ण होईल आणि सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढले जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
 
धामी म्हणाले, "पीएम मोदी सतत कामगारांची संपूर्ण माहिती घेत आहेत आणि उपायांवर चर्चा करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व एजन्सी बचाव कार्यासाठी एकत्र काम करत आहेत."
 
पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर कुळबे यांनीही काही अडथळे न आल्यास बचाव पथक शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कामगारांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
 
बोगद्यातील कामगारांचे नातेवाईक काय म्हणाले?
उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेले आपले पती विरेंद्र लवकर बाहेर यावेत, यासाठी त्यांची पत्नी रजनी चातकासारखी वाट पाहतेय.
 
उत्तरकाशीच्या सिलक्यारा गावात बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या यादीत विरेंद्र किस्कूही आहेत.
 
विरेंद्र मुळचे बिहारच्या बांका जिल्ह्यातील आहेत.
 
बोगद्याची घटना घडल्याच्या तीन दिवसांनंतर विरेंद्र यांचे मोठे भाऊ देवेंद्र किस्कू बिहारहून उत्तरकाशीला पोहोचले.
 
सध्या ते बोगद्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका खोलीत राहतायत.
 
विरेंद्र यांची पत्नी रजनीही तिथेच राहतात.
 
दोघेही विरेंद्र यांच्याशी बोलण्यासाठी बोगद्याजवळ जात असतात.
"विरेंद्रची आम्हाला खूप काळजी लागली आहे. त्याला पाहण्यासाठी आम्ही आमच्या घरापासून इतके लांब आलो आहोत. विरेंद्रलाही आमची काळजी वाटत आहे,” असं देवेंद्र सांगतात.
 
बोगद्याजवळ जाऊन पत्नी रजनी आणि भाऊ देवेंद्र दोघे मिळून विरेंद्र यांना रोज धीर देत आहेत.
 
"विरेंद्र आम्हाला विचारतो, दादा आम्हाला बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? आम्ही म्हणतो इथे दिवसरात्र प्रयत्न सुरू आहेत. तुम्हाला लवकरच बाहेर काढलं जाईल. तुम्ही काळजी करू नका”
 
देवेंद्र पुढे म्हणतात, "मला दिसतंय की प्रशासनातील लोक जमेल तितक्या वेगाने काम करत आहेत. सुरुवातीला जेव्हा मशीन्समध्ये बिघाड झाला तेव्हा आम्हाला काळजी वाटली होती. पण आता असं वाटतंय की सगळं ठीक होत आहे."
 
विरेंद्र यांची पत्नी रजनीही उत्तरकाशीत आहेत. त्याही आपल्या पतीशी बोलतात.
 
विरेंद्र यांनी त्यांनास सांगितलं की ते रात्री रोटी खातात आणि सकाळी ताजी खिचडी खातात.
 
पण विरेंद्र एकदा बाहेर आले की त्यांनी हे काम करू नये असं पत्नी रजनी यांना वाटतं.
 
“माझे पती सुखरूप बाहेर पडल्यावर त्यांनी हे काम करू नये. दुसरं काहीतरी काम करावं असं आम्हाला वाटतंय."
 
भाऊ देवेंद्र यांचंही तेच मत आहे. "तो (देवेंद्र) उत्खनन ऑपरेटर म्हणून काम करतो. तो हे काम इतरत्र कुठेतरी उघड्यावर करू शकतो. त्याने बोगद्यात काम करू नये, अशी कुटुंबाची इच्छा आहे. पण शेवटी तो बाहेर कधी येणार हे हाच मोठा प्रश्न आहे"
 
गुरुवारी रात्री खोदकाम थांबलं, काय आली अडचण?
उत्तरकाशीच्या सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्याचं काम पुन्हा एकदा ऑगर ड्रिलिंग मशीनमध्ये बिघाड झाल्यानं गुरुवारी (23 नोव्हेंबर) रात्री थांबलं. आज शुक्रवारी (24 नोव्हेंबर) बचावकार्याचा 13 वा दिवस आहे.
 
मजुरांना बाहेर काढण्याच्या कामात 14 तासांच्या व्यत्ययानंतर गुरुवारी ( 23 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता पुन्हा ड्रिलिंग सुरू करण्यात आलं. मात्र, गुरुवारी ( 23 नोव्हेंबर) रात्री पुन्हा मशिनमध्ये बिघाड झाल्यानं ड्रिलिंगचं काम बंद पडलं. त्यावेळी बोगद्यात अडकलेले मजूर केवळ 10 ते 13 मीटर अंतरावर होतं.
 
ज्या प्लॅटफॉर्मवर ड्रिलिंगसाठी मशिन बसवण्यात आलं होतं, त्या प्लॅटफॉर्ममध्ये काही भेगा पडल्या होत्या. त्यामुळे प्लॅटफॉर्म हलू लागला. गुरुवारी ऑगर ड्रिलिंग मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ड्रिलिंगचं काम थांबवण्यात आलं होतं. आतापर्यंत बचावकर्त्यांनी सिल्क्यरा बोगद्यात 46.8 मीटरपर्यंत ड्रिल केलं आहे.
 
या बिघाडानंतर ड्रिलिंगचं काम बंद करण्यात आलं. आता तांत्रिक टीम 25 टन वजनाचा हा प्लॅटफॉर्म स्थिर करण्यात व्यस्त आहे. हा दोष सुधारल्यानंतरच पुन्हा ड्रिलिंग सुरू करता येईल.
 
उत्तरकाशीत घटनास्थळी उपस्थित असलेले पीएमओचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे शुक्रवारी (23 नोव्हेंबर) सकाळी म्हणाले, "आता परिस्थिती खूप चांगली आहे. काल रात्री आम्हाला दोन गोष्टींवर काम करायचं होतं. पहिलं, आम्हाला मशीनच्या प्लॅटफॉर्मची दुरुस्ती करायची होती. पार्सन्स कंपनीनं ग्राउंड पेनिट्रेशन रडारचं काम केलं. ज्याद्वारे आम्हाला कळलं की पुढील 5 मीटरपर्यंत कोणताही धातूचा अडथळा नाही. याचा अर्थ असा की आमचे ड्रिलिंग सुरळीत व्हायला हवं. आम्ही ढिगारा बाहेर काढत असताना आम्हाला दोन भंगार पाईप्स मिळाले."
 
मजुरांना बाहेर काढण्यासाठी पाइपलाइन टाकली
यापूर्वी मजुरांना बाहेर काढण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्यात आली होती. पण या संपूर्ण ऑपरेशनमध्ये डोंगर आणि त्याचे मोठे खडक एकामागून एक आव्हानं देत आहेत.
 
57 मीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याच्या कामात लोखंडी गर्डर अडथळा बनला, तेव्हा आम्हाला त्या आव्हानांची झलक दिसली.
 
सर्व पर्यायांपैकी सरकारनं अखेर हॉरिझॉन्टल रेस्क्यू पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये 800 मिलीमीटर (32 इंच) रुंदीचे जाड पाईप टाकण्याचं काम करण्यात आलं.
 
प्रथम ऑगर मशीन बसविण्यात आलं, ज्याद्वारे पाईपसाठी जागा तयार करण्यासाठी ड्रिलिंग केलं गेलं. त्यानंतर या पाईप्सची एक लाईन करण्यात आली. प्रत्यक्षात, पाईपलाईनचा जवळजवळ अर्धा भाग 900 मिलीमीटर आहे. आणि नंतर पुढील पाईप 800 मिलीमीटर रुंदीचे बसवण्यात आले.
 
वेल्डिंगला दोन ते तीन तास लागले. कारण ही टॉर्क वेल्डिंग पद्धत आहे, ज्यामुळे लोखंड गरम होतं आणि ते थंड होण्यासाठी आणि व्यवस्थित सेट होण्यासाठी सुमारे 2 ते 3 तास लागतात.
 
या वेळेपूर्वी दुसरा पाईप जोडण्याचा प्रयत्न केल्यास, वेल्डिंग आणि पाईप खराब होऊ शकतात.
 
गर्डर कापून मार्ग तयार केला होता
बुधवारी ( 22 नोव्हेंबर) सायंकाळी पाईपलाईन टाकण्याचं काम ढिगाऱ्यामध्ये गर्डर आल्यामुळे खोळंबल्यानं ऑगर मशीनचं काम बंद पडलं होतं.
 
घटनास्थळी उपस्थित असलेले इंटरनॅशनल टनेलिंग अंडरग्राउंड स्पेसचे अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स यांनी गुरुवारी (23 नोव्हेंबर) संध्याकाळी सांगितलं की, आमची काल अशी अपेक्षा होती की या वेळेत मजूर बाहेर पडतील. पण आज सकाळी आणि आज दुपारी सुद्धा आम्ही अशीच अपेक्षा करत होतो. पण असं दिसतं की डोंगराची काही वेगळीच इच्छा होती. आम्हाला ऑगर मशीन बंद करावी लागली आणि मशीनवर काही दुरुस्ती केली जात होती."
 
ते म्हणाले, "कदाचित आम्ही अशा टप्प्यात प्रवेश करत आहोत जिथ आम्हाला इतर पर्यायांचा विचार करावा लागेल."
 
ऑगर मशिनच्या साह्याने ड्रिलिंगचे काम केलं जातं आणि त्याचा वापर करून पाइपलाइन टाकण्यासाठी जागा तयार केली जात होती.
 
13 किमी लांबीचा झोझिला बोगदा हा भारतातील सर्वात लांब बोगदा आहे. त्याचे प्रकल्प प्रमुख हरपल सिंह देखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की, ड्रिलिंगचं काम सुरू असताना त्यामध्ये गर्डर आला होता. तो गर्डर कापण्यासाठी गॅस कटर आणण्यात आलं होतं. आणि त्याला कापून काढल्यानंतरच मशीननं पुन्हा ड्रिलिंग सुरू केलं.
 
12 मीटरचं अंतर पार करण्यासाठी संघर्ष
हरपाल सिंह म्हणाले, "पाईपला पुश करायला, वेल्ड करायला आणि गर्डर कापायला थोडा वेळ लागतो."
 
बुधवारी सायंकाळपर्यंत 44 मीटर पाईपलाईन टाकण्यात आली असून अजून 12 मीटर टाकणं बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं. संपूर्ण 57 मीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याचं उद्दिष्ट होतं.
 
प्रत्येकी सहा मीटरचे तीन पाइप जोडण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.
 
जरी पाईप मध्यभागी थोडेसे दाबले गेले आणि ते 24 इंच रुंद असले तरीही मजुरांना त्यातून बाहेर काढता येईल. त्यामुळे मोठ्या रुंदीचे पाईप वापरले जात आहेत.
 
दुसरीकडे मजुरांना सुरक्षितपणे रुग्णालयात नेण्यासाठी एनडीआरएफचे जवान घटनास्थळी तैनात आहेत. बोगद्याजवळ डझनभर रुग्णवाहिकाही उभ्या असून स्ट्रेचरही आणण्यात आले आहेत.
 
बचाव कार्यात कोण सहभागी आहेत
एसजेव्हीएनएल ही ड्रिलिंग आणि पाइपलाइनचे काम पाहत आहे. हा सरकारी प्रकल्प आहे.
 
बोगद्याचे कामही रेल्वे पाहते, त्यामुळे तेथील तज्ज्ञ आणि अधिकारीही उपस्थित असतात.
 
एनएचआयडीसीएल या बोगद्याचे बांधकाम पाहत असून त्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. आयटीबीपीचे जवानही येथे उपस्थित आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ (राज्य युनिट) च्या टीम देखील इथं बचाव कार्यात गुंतलेल्या आहेत.
 
तज्ज्ञांना पाचारण
बोगद्यातील ढिगाऱ्यात ड्रिल करत असलेले बचाव कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या जवळ आहेत, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
उत्तरकाशी रेस्क्यू ऑपरेशन टीमचे सदस्य गिरीश सिंह रावत म्हणाले की, "रेस्क्यू ऑपरेशन जवळपास शेवटच्या टप्प्यात आहे, मला आशा आहे की 1-2 तासात निकाल येईल.कामगारांना बाहेर काढण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे.ढिगाऱ्यात अडकलेले स्टीलचे तुकडे कापून काढण्यात आले आहेत. पाईपलाईन ड्रिलिंगमध्ये उद्भवलेली समस्या सोडवली गेली आहे.पाइपलाईन टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोगद्यात मध्ये वीज पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय."
सिलक्यारा बोगदा पीआरओनं सांगितलं की ढिगाऱ्यात धातूचे मोठे गज होते जे कापणं अवघड कार्य होतं. छोटे धातूचे तुकडे ते कापू शकतात. पण धातूचे मोठे गज कापण्यासाठी त्यांना जड यंत्रांची आवश्यकता आहे.ते आत ढिगाऱ्यातून काढणं आवश्यक आहे. काम लवकर सुरू व्हायला हवं.
 
वेल्डिंगतज्ज्ञांना दिल्लीहून सिलक्यारा बोगद्याच्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे जेथे अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.
 
बोगद्यांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय
उत्तरकाशी इथं घडलेल्या घटनेनंतर देशात सुरू असलेल्या 2 डझनांपेक्षा जास्त बोगद्यांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी देशातल्या 29 बोगद्यांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
हे ऑडिट एनएचएआयसह दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनचे अधिकारी करतील. या दोन्ही संस्थांनी एकत्रित काम करुन एका आठवड्याच्या आत अहवाल द्यावेत असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
 
यातले 12 बोगदे हिमाचल प्रदेशात, 6 जम्मू आणि काश्मीरमध्ये आणि बाकीचे उत्तराखंड आणि इतर राज्यांत आहेत.
 
बुधवारी (22 नोव्हेंबर) संध्याकाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की त्यांना खात्री आहे की गुरुवारी दुपारपर्यंत कामगारांची सुटका केली जाईल.
 
12 नोव्हेंबर रोजी कामगार बोगदा बांधत असताना भूस्खलनामुळे त्याचा काही भाग कोसळला होता.
 
अधिकाऱ्यांनी काही तासांतच या बोगद्यात अडकलेल्या कर्माचाऱ्यांशी संपर्क स्थापित केला होता.
 
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन,अन्नपदार्थ आणि पाणी पोहचवण्यात आलं. याप्रकरणी अधिकारी नियमित अपडेट देत असून बचाव कार्य अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
पण मजुरांचे कुटुंब आणि मित्र चिंताग्रस्त आणि संतप्त झाले आहेत. मजुरांना काढण्यासाठी इतका वेळ का लागतो आहे असा प्रश्न त्यांना पडलाय
सोमवारी(20 नोव्हेंबर) एंडोस्कोपिक कॅमेरा नवीन पाईपमध्ये टाकून मजुरांचा पहिला व्हीडिओ मिळाला होता. अधिकाऱ्यांनी त्यांना कॅमेऱ्यासमोर स्वतःची ओळख पटवण्यास सांगितलं आणि लवकरच त्यांची सुटका केली जाईल असं आश्वासन दिलं. मदत करणारे कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत.
 
नवीन पाईप रुंद आहे आणि अधिकारी म्हणतात की ते आता अधिक ऑक्सिजन, अन्न आणि औषधे, मोबाईल फोन आणि चार्जर यांसारख्या आवश्यक गोष्टींचा पुरवठा करता आला.
 
मंगळवारी ( 21 नोव्हेंबर) तब्बल 10 दिवसांनी कामगारांना पहिलं गरम जेवण पोहचवण्यात आलं. डाळ तांदुळाची खिचडी पॅक करून त्यांना गरम जेवण बोगद्याच्या आत पाठण्यात आलं.
 
Published By- Priya Dixit