रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 एप्रिल 2021 (08:05 IST)

अदार पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा

सीरम चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. एस्ट्रेजेनिकासोबतच देशात सर्वात मोठी वॅक्सिन निर्मात्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अदार पूनावाला यांच्या सुरक्षेसाठीची जबाबदारी आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली आहे.  
 
गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या आदेशानुसार अदार पूनावाला यांच्या सुरक्षेत केंद्रीय राखील सुरक्षा बल (CRPF) च्या माध्यमातून सुरक्षा देण्यात येईल. पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) मध्ये सरकार आणि नियमन विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहून पूनावाला यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसारच केंद्राने हा निर्णय घेतला आहे. भारतात दिल्या जाणाऱ्या Covid-19 विरोधी लसींपैकी एक लस म्हणजे कोविशील्डची निर्मिती सीरममार्फत करण्यात येत आहे. पण सीरम इंस्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांना अनेक गटांकडून धमकी मिळत असल्याचा उल्लेख सीरमकडून लिहिण्यात आलेल्या पत्रात करण्यात आला आहे. 
 
वाय दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत एकुण ११ जणांच्या सुरक्षा रक्षकांची टीम आता अदार पूनावाला यांच्यासाठी नेमण्यात आली आहे. त्यामध्ये एक ते दोन कमांडोदेखील असतील. देशभरात सर्व ठिकाणी हे सिक्युरीटी कव्हर असेल. देशभरात कोरोना विरोधातील लढाईत लढणाऱ्या महत्वाच्या अशा व्यक्तींपैकी एक असे आहेत. म्हणूनच त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.