मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: रविवार, 21 जुलै 2024 (11:16 IST)

लैंगिक अत्याचाराविरोधी लढ्यानंतर आता ऑलिम्पिकच्या आखाड्यासाठी सज्ज झाल्या महिला कुस्तीपटू

रितिका हुड्डा हिला कदाचित ऑलिम्पिकपर्यंत पोहोचताही आलं नसतं.पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पाच महिला कुस्तीपटूंमध्ये तिचा समावेश आहे.राष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धांमध्ये वारंवार पराभवाचा सामना कराला लागल्यानंतर रितिकाचा आत्मविश्वास पुरता डळमळीत झाला होता.
 
पण ढासळत चाललेल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तिला प्रशिक्षण आणि स्पर्धांमध्ये भाग घेणं गरजेचं होतं. पण त्यावेळी भारतात कुस्ती स्पर्धा किंवा सराव थांबलेला होता.
गेल्यावर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यांनी मात्र वारंवार हे आरोप फेटाळले आहेत.
 
क्रीडा मंत्रालयानं त्यांना हटवलं नाही. पण, सुरुवातीच्या चौकशीत लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली संपूर्ण कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात आला. नंतर महासंघाच्या देखरेखीत एक अ‍ॅड-हॉक कमिटी नेमण्यात आली होती.
 
असं यापूर्वी कधीही झालं नव्हतं.
रितिकाने देशातील सर्वात प्रतिष्ठित कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलन करत असलेलं पाहिलं. त्यात भारतासाठी पदक जिंकणारी एकमेव महिला कुस्तीपटू साक्षी मलिकही होती. ती रितिकाचं प्रेरणास्थान होती.

कुस्तीपटूंच्या या आंदोलनाची बातमी जगभर पसरली.विशेषत: त्यांनी संसद भवनापर्यंत मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांना ‘परवानगी नाही’ या कारणाखाली अटक केली होती, तेव्हा याची प्रचंड चर्चा झाली.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं कुस्तीपटूंबरोबर करण्यात आलेल्या वर्तनावर टीका केली आणि त्यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
 
रोहतकमध्ये आम्ही रितिकाबरोबर चर्चा करत होतो. त्यावेळी बोलताना ती म्हणाली की, “ते दिवस अतिशय वाईट होते. जे सुरू होतं त्यामुळेसुद्धा आणि जे व्हायला हवं ते होत नव्हतं म्हणूनही.”अखेर आंदोलनाच्या एक वर्षानंतर डिसेंबर 2023 कुस्ती महासंघाच्या निवडणुका झाल्या.
 
ब्रिजभूषण यांच्याशी निगडीत लोकांनी निवडणुकीला उभं राहू नये, अशी मागणी कुस्तीपटूंनी क्रीडामंत्र्यांना केली होती. ब्रिजभूषण यांनी स्वत: निवडणुकीत सहभाग घेतला नाही. कारण, ते आधीच सर्वांत जास्त वेळा म्हणजे तीन वेळा या पदावर होते. पण त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलेदेखील.
 
लैंगिक हिंसाचाराविरोधात लढणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी यावर रोष आणि दु:ख व्यक्त केलं. त्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत पदकविजेत्या साक्षी मलिकने अतिशय जड अंत:करणाने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला.
 
6 महिन्यानंतर जेव्हा मी साक्षीशी पुन्हा बोलले तेव्हा ती म्हणाली, “आजही मला जेव्हा तो क्षण आठवतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं. कुस्तीमुळे मी एका वेगळ्या उंचीवर गेले होते. या खेळाने मला प्रेम, आदर, दिला आणि मला तो खेळ सोडावा लागला.”
 
लैंगिक अत्याचाराच्या आरोपांचा परिणाम
साक्षीच्या भूमिकेमुळे या तरुण कुस्तीपटूंच्या मनात खळबळ निर्माण झाली. पण लवकरच ती कुस्ती खेळायला तयार झाली. हरियाणातील 20 वर्षीय तनू मलिक म्हणाली, “मी साक्षी मलिकला ऑलिम्पिक पदक जिंकताना पाहिलं होतं. त्यामुळे मीही कुस्ती खेळायचं धाडस केलं. माझ्या नावामुळे माझ्या गावाची प्रतिमा उंचावणार होती. जेव्हा साक्षीला टीव्हीवर रडताना पाहिलं तेव्हा माझ्या मनात आलं, की ती आपल्यासाठी इतकी लढली तर आम्ही हार कशी मानू?”
2016 मध्ये साक्षीने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यावर हरियाणामध्ये महिला कुस्तीला नवी ऊर्जा मिळाली. आई वडील मुलींना कुस्तीसाठी प्रोत्साहन देऊ लागले आणि राज्यात महिलांसाठी वेगवेगळे आखाडे सुरू झाले. अशाच एका आखाड्यात तनूचं प्रशिक्षण पहाटे साडे चार वाजता सुरू होतं.
 
पाच तासाच्या या सत्रात विविध प्रकारचे व्यायाम आणि कुस्तीचे वेगवेगळे डावपेच शिकण्याशिवाय ट्रकचं पन्नास किलोचं टायर उचलण्याचाही समावेश असतो.
जेवण झाल्यानंतर थोडा आराम केल्यावर संध्याकाळी पुन्हा असंच चार ते पाच तासाचं सत्र असतं.
 
इथे आम्हाला 12 ते 22 या वयोगटातल्या मुली भेटल्या, त्या इथेच राहतात.एका मोठ्या खोलीत, त्या झोपतात आणि इतरवेळी शरीर कमावण्यासाठी जे डाएट लागतं त्यावर खूप चर्चा करतात.
कुस्ती महासंघात झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराबद्दल बोलण्यास मात्र त्या जराही उत्सुक नव्हत्या.
कुस्तीच्या या प्रारुपात, कायदे पाळून, त्यात करिअर करण्यासाठी जी जिद्द लागते ती या महिलांमध्ये भरभरून आहे.त्यांच्या प्रशिक्षक सीमा खरब यांच्या मते आंदोलन झाल्यानंतरही मुलींची संख्या कमी झालेली नाही.
“आंदोलनामुळे युवा खेळाडूंना कळलं की, आवाज उठवणं शक्य आहे. लोकांवर कारवाई होते आणि व्यवस्थेत त्यांना योग्य पाठिंबा मिळू शकतो,” असं त्या म्हणाल्या.
 
भीती आणि विश्वास
मे 2024 मध्ये दिल्लीच्या एका न्यायालयाने ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक हिंसाचार, पाठलाग करणं, धमकी आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणं हे आरोप निश्चित केले. 26 जुलैला ब्रिजभूषण यांच्यावरच्या खटल्याला सुरुवात होईल.
 
यादरम्यान संजय सिंह यांनी कुस्ती महासंघाची सूत्रं हाती घेतली आहे.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, ते ब्रिजभूषण यांना गेल्या 30 वर्षांपासून ओळखतात पण आपल्या कामात ते ढवळाढवळ करत असल्याचा आरोप मात्र त्यांनी फेटाळला.
 
कुस्तीपटूंनी त्यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारलं आहे, असा त्यांचा दावा आहे. कुस्ती स्पर्धांत मुली मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे, यातून ते स्पष्ट होतं, असंही ते म्हणाले.
“कुणालाही उगाचच प्रोत्साहन दिलं जाणार नाही आणि कोणाबरोबरही भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येक कुस्तीपटू मला प्रिय आहे. मलाही दोन मुली आहेत. त्यांना काय हवं असतं याची मला जाणीव आहे,” असं संजय सिंह म्हणाले.
 
मात्र, तनू मलिक सारख्या युवा कुस्तीपटूंसाठी भीतीचा सामना करणं हा या खेळाचाच भाग बनला आहे.
तनू म्हणते, “हे इतकं सोपं नाही. मुलीला एकटं कसं पाठवायचं याबद्दल आई वडिलांना कायमच चिंता वाटत असते. पण ते विश्वासाने पाठवतात. विश्वास नाही ठेवला तर कसं चालेल? हे म्हणजे लढण्याआधीच हार मानल्यासारखं होईल.”काही कुस्तीपटू अजूनही खूप निराश आहेत. त्यांना हे आंदोलन प्रकरण अतिशय महागात पडलं आहे.
 
संपूर्ण वर्ष वाया गेले
आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी शिक्षा खरब म्हणाली की, “प्रशिक्षणात पडलेला खंड आणि कुस्ती स्पर्धा थांबल्याने काही कुस्तीपटूंचं पूर्ण वर्षं वाया गेलं.”मात्र साक्षी मलिकला याचं काही दु:ख नाही.ती म्हणाली, “आपण लढा दिला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता महासंघात कोणीही असं वागणार नाही. आता त्यांना कळलं आहे की छळ केला तर त्याचे काय परिणाम होतील.”

रितिकाची ही पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आहे. जगातल्या सर्वोत्तम कुस्तीपटूंशी खेळायचं या कल्पनेने तिच्या पोटात गोळा आला आहे. पण तिची जिद्द कमी झालेली नाही.”
 
रितिकाच्या छोटूराम आखाड्यात भारताचा झेंडा खांद्यावर घेतलेला साक्षी मलिकचा हसरा फोटो लावलेला आहे.
 
रीतिका म्हणते, “मला फक्त आता ऑलिम्पिकचं पदक जिंकायचं आहे. कुणास ठाऊक एक दिवस माझाही फोटो आखाड्याच्या भिंतीवर असेल.”
 
Published By- Priya Dixit