3 वर्षीय चिमुकलीसमोर आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर याठिकाणी एक धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला आणि यात कुटुंबातील 3 वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली आहे. परंतु तिच्या डोळ्यादेखील तिच्या कुटुंबाचा दुर्देवी अंत झाला.
नेमकं काय घडलं?
अशोक दगडू पवार आपली पत्नी आणि दोन मुलींना घेऊन शिक्रापूर चाकण रस्त्याने जात होते. दरम्यान जातेगाव फाटा येथून जाताना त्यांना एक फोन आला. पवार यांनी फोनवर बोलण्यासाठी रस्त्याच्या कडेला एका हॉटेलसमोर आपली दुचाकी थांबवली. दरम्यान पाठीमागून येत असलेल्या भरधाव कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीसह संपूर्ण पवार कुटुंब कंटेनरखाली चिरडलं गेलं. सुदैवाने त्यांची 3 वर्षाची चिमुकली यातून थोडक्यात बचावली.
ही घटना घडताच स्थानिक नागरिकांनी आरोपी कंटेनर चालकाला पकडलं. घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं.
अशोक दगडू पवार (वय-45), सारीका अशोक पवार (वय-40) आणि अनु अशोक पवार (वय- 7 महिने) असं अपघातात मृत पावलेल्या कुटुंबाचं नाव आहे. तीन वर्षीय जखमी मुलीवर उपचार सुरू आहेत. बालाजी संजय येलगटे असं आरोपी कंटेनर चालकाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या दुर्दैवी अपघातात 3 वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यासमोर तिचे आई-वडील आणि 7 महिन्यांच्या धाकट्या बहिणीनं प्राण सोडला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पुढील कारवाई केली जात आहे.