पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’ साठी सोमवारी वाकडला निवड चाचणी
पुणे : राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सोमवारी (ता. २३) वाकड येथील कावेरीनगर क्रीडा संकुलात निवड चाचणी कुस्ती स्पर्धा होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे व सरचिटणीस संतोष माचुत्रे यांनी दिली.
राज्य कुस्तीगीर संघातर्फे ६६ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब स्पर्धा होणार आहे. त्यात सहभागासाठी शहरातील पहेलवानांमधून निवड केली जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघातर्फे सोमवारी वाकड येथील कावेरीनगर क्रीडा संकुलात निवड चाचणी कुस्ती स्पर्धा वरिष्ठ गट माती व गादी विभागात होणार आहे.
त्यासाठी पहेलवानांची वजने स्पर्धेच्या दिवशी अर्थात सोमवारी (ता. २३) सकाळी नऊ ते ११ या वेळेत क्रीडा संकुलात घेण्यात येतील. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होईल. वरिष्ठ माती व गादी विभागासाठी ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो वजनगटात आणि महाराष्ट्र केसरी किताब लढतीसाठी ८६ ते १२५ किलो वजन गटात स्पर्धा होईल.
Edited By - Ratnadeep ranshoor