बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (08:25 IST)

शिबा कुरिझ व शिबा निधी चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना उच्च न्यायालयाचा दणका

बोपोडी येथील शिबा कुरिझ व शिबा निधी  या चिटफंड घोटाळ्यातील आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच आरोपींना पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात  हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार खडकी पोलिसांनी चिटफंडमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले आहेत अशांनी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आवाहन केले आहे.
 
पुण्यातील  खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोपोडी ( येथील शिबा कुरिझ व शिबा निधी चिटफंडमध्ये अनेकांनी गुंतवणूक  केली आहे. मात्र, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी चिटफंडचे संचालक मेलुकुलम दामोदरन श्रीनिवासन , सीमा मेलुकुलम श्रीनिवासन  व वरुण मेलुकुलम श्रीनिवासन ) यांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात 406,420,34 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल  करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) मिळावा यासाठी आरोपींनी सत्र न्यायालय पुणे  येथे अर्ज केला होता. सुनावणी दरम्यान खडकी पोलिसांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
 
या अर्जावर 24 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी आरोपींनी गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास तयार असल्याचे वकीलांमर्फत न्यायालयात सांगितले.त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना 4, 5 आणि 6 ऑक्टोबर 2021 रोजी खडकी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.तसेच पोलीस ठाण्यात हजर राहून त्यांनी केलेली गुंतवणूक दाखवण्याचे आदेश तिन्ही आरोपींना दिले आहेत.
 
शिबा कुरिझ व शिबा निधी, बोपोडी या संस्थेकडून ज्या गुंतवणूकदारांची फसवणुक झाली आहे.अशा गुंतवणूकदारांनी 4, 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी खडकी पोलीस ठाण्यात हजर रहावे.तसेच ज्यांना हजर राहता येणार नाही अशा गुंतवणूकदारांनी खडकी पोलीस स्टेशनच्या इमेल आयडीवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन खडकी पोलिसांनी केले आहे.