शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2023
  3. राजस्थान विधानसभा निवडणूक 2023
Written By

वसुंधराराजे यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

वसुंधरा यांचं शिक्षण तामिळनाडूतलं हिल स्टेशन कोडाईकनाल इथे एका बोर्डिंग स्कूलमध्ये झालं. त्या तिथे हाऊस कॅप्टन बनल्या आणि स्पर्धेला तोंड देत पुढे जायला शिकल्या.
12 वी पर्यंत शिक्षण तिथे पूर्ण केल्यावर वसुंधरा यांनी मुंबईतील सोफिया कॉलेजमधून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात ऑनर्ससह पदवी घेतली.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्यांनी पदवी प्राप्त केली.
 
1) ग्वाल्हेर राजघराण्यातील राजकन्या आणि धौलपूर राजघराण्याची सून, पाच वेळा आमदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या वसुंधरा राजे यांच्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण म्हणजे पाच जातींसोबत असलेला त्यांचा थेट संपर्क.
 
2) त्या स्वतः मराठा राजपूत आहेत. जाट राजघराण्यात त्यांचं लग्न झालं आहे. त्यांच्या पतीचा जन्म शीख राजघराण्यात झाला होता आणि जाट राजघराण्यातील आजोबांनी त्यांना दत्तक घेतलं.
त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात वसुंधरा राजे यांना या सगळ्यांचं समर्थन मिळवून आपलं स्थान भक्कम करण्याची संधी मिळाली.
वसुंधरा राजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री आणि कार्मिक मंत्रालयाच्या मंत्री म्हणून काम केलं होतं.
2003 साली राजस्थानच्या रणांगणात त्यांना उतरवण्यात आलं, तेव्हा वसुंधरा यांनी भाजपच्या ‘उदास आणि कलह माजलेल्या’ राजकीय स्थितीतही 200 पैकी 120 जागा जिंकून इतिहास रचला.
 
3) त्यापूर्वी भाजपला कधीही राजस्थानच्या राजकारणात बहुमत आणता आलं नव्हतं.
1977 मध्ये जनता पक्षाने 152 जागा जिंकल्या तेव्हा पक्षाचे नेते भैरोसिंग शेखावत हे कसेबसे मुख्यमंत्री बनले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 95 चा आकडाही पार करता आला नाही.
वसुंधरा राजे यांच्या आधी भाजपच्या भैरोसिंह शेखावत आणि इतर नेत्यांच्या कारकिर्दीत राजस्थान विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवर एकदा नजर टाका.
 
4) शेखावत तीन वेळा मुख्यमंत्री झाले. एकदा जनता पक्षाच्या काळात 152 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर, भाजपचे नेते म्हणून ते दोनदा मुख्यमंत्री झाले.
1990 मध्ये ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा भाजपला 85 जागा मिळाल्या होत्या. 1993 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपला 95 जागा मिळाल्या होत्या.
त्यावेळी बहुमतासाठी 101 जागा आवश्यक होत्या.
 
5) वसुंधरा राजेही दोन वेळा भाजपकडून राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या. 2003 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली 120 जागा निवडून आल्या आणि 2013 मध्ये त्यांनी 163 जागा मिळवून विक्रम रचला.
पण 2013 साली एवढ्या जागा मिळण्यामागे त्यावेळची मोदी लाटही कारणीभूत होती, असं काही राजकीय तज्ञ म्हणतात.
त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विविध भागात जाहीर सभा घेतल्या होत्या. या सभांना प्रचंड गर्दी होती.
त्या निवडणुकीत वसुंधरा राजे यांनी तत्कालीन गेहलोत सरकारविरोधात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात भाजप नेते भूपेंद्र यादव त्यांच्यासोबत होते असंही तज्ञ सांगतात.
 
6) खरं तर पाच वर्षांपूर्वीच बदलाचे संकेत मिळाले होते. त्यावेळी वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेतून पायउतार होऊन अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं होतं.
काही दिवसांनंतर म्हणजेच 10 जानेवारी 2019 रोजी वसुंधरा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या टीममध्ये उपाध्यक्षपद दिलं गेलं. त्यामुळे त्यांना राजस्थानात विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही हे तर निश्चित झालं होतं.
त्याऐवजी पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबचंद कटारिया विरोधी पक्षनेते झाले.
कटारिया यांची नंतर आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्या जागी राजेंद्रसिंह राठोड हे विरोधी पक्षनेते बनले. याआधी सी पी जोशी यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं होतं.