बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 जानेवारी 2024 (20:51 IST)

शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी

koregaon bhima
कोरेगाव भीमा : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगावाता आज २०६ वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. त्यामुळं विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. मध्यरात्री पासून अनेक भीम अनुयायी या ठिकाणी गर्दी करू लागले आहे.
 
दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी १ जानेवारीला येथे अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. यंदाच्या अभिवादन सोहळ्यासाठी विजयस्तंभाला साडेचार टन वजनाच्या विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
 
दरम्यान कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भीमसैनिकांनी गर्दी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भीमा-कोरेगाव येथे दाखल होत भल्यापहाटे विजयस्तंभाला अभिवादन केलं. कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ भारताच्या इतिहासातील शौर्याचं प्रतिक आहे.
 
शौर्यदिनानिमित्त राज्यभरातून अनेक भीमसैनिक रविवारी रात्रीच कोरेगाव-भीमा परिसरात दाखल झाले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील ठेवला आहे.
 
पोलिसांसह आरोग्य सेवा, वाहतुक, पार्किंग, शौचायल अशा सर्व सुखसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांच्या मदतीसाठी ३२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ७०० होम गार्ड्स आणि SRPF च्या ६ तुकड्या तैनात करण्यात आल्यात. शिवाय आरोग्य सेवेसाठी २९ ठिकाणी आरोग्य कक्ष,५० रुग्णवाहिका, ९० तज्ञ डॉक्टर २०० आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आलेत.
 
सोहळ्याचे मुख्य केंद्रबिंदू असणारा विजय स्तंभ ७५ फूट उंच आहे. त्यासाठी चारही बाजूंनी क्रेनच्या साहाय्याने साडे चार टन वजनाच्या विविध फुलांची सजावट करण्यात येत आहे.