रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अहमदनगर , शनिवार, 26 मार्च 2022 (21:33 IST)

क्लासमधीलअल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या युवकाला न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गणेश दादासाहेब सावंत (वय 20 रा. जोहारवाडी ता. पाथर्डी) या युवकाला जिल्हा न्यायालयाने दोषीधरून एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला. सरकारी वकील म्हणुन श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे- शिंदे यांनी काम पाहिले.
8 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी पीडित अज्ञान मुलगी (वय 12) ही क्लास सुटल्यानंतर बिल्डींगच्या जिन्यामधुन खाली उतरत असताना गणेश सावंत याने तिचा हात पकडुन तिला ‘आय लव्ह यु’ म्हटले.
‘कुणाला सांगु नको’, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलगी शाळेत रडत रडत गेली व सदरची घटना तिने शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांना सांगितली.
तसेच घरी गेल्यानंतर आई-वडिल व घरातील इतरांना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी जावुन पीडित मुलीने तिच्या वडिलांना गणेशला दाखविले.त्यानंतर पीडित मुलीसह तिच्या वडिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गणेश सावंत विरोधात भादंवि. कलम 354, 506 व पोक्सो कायदा कलम 7 व 8 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
 
सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जावळे यांनी करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती मोरे यांचेसमोर झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण सात साक्षीदार तपासण्यात आले.
पीडित मुलगी, पीडित मुलीचे वडिल, शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक, पंच साक्षीदार तपासी अंमलदार तसेच वयासंदर्भात मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
न्यायालयासमोर आलेल्या साक्षी-पुरावा तसेच सरकारी वकील केळगंद्रे-शिंदे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गणेश सावंत याला शिक्षा ठोठावली. खटल्याचे सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी महिला पोलीस अंमलदार नंदा गोडे तसेच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई भिंगारदिवे यांनी मदत केली.