मित्राकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार,सहा महिन्यांची गरोदर
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
याप्रकरणी पोलिसांनी 23 वर्षीय जयदीप जयपाल चौधरी असं नाव असलेल्या आरोपी तरुणाला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने त्याला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 मध्ये पीडित मुलीची सोशल मीडियावर जयदीप चौधरी नावाच्या मुलाशी ओळख झाली आणि नंतर दोघांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर ते सातत्याने चॅटींगच्या करत एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी आरोपी जयदीप याने पीडितेकडं भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
दरम्यान, पीडित मुलगी एका कार्यक्रमानिमित्त आपल्या नातेवाईकांकडे इस्लामपूर आली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यातही ती आपल्या नातेवाईकांकडे राहण्यास आली होती. यावेळी आरोपीनं पीडित मुलीला इस्लामपूर बस स्थानक परिसरात भेटण्यासाठी बोलावलं आणि नंतर आरोपी पीडितेला बहे बेटावर फिरायला घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं पीडितेवर अत्याचार केला.
यानंतर, आरोपीनं वेळोवेळी लग्नाचं आमिष दाखवत पीडितेवर अत्याचार केले आहेत. दरम्यान, 7 नोव्हेंबर रोजी अचानक पीडित मुलीच्या पोटात दुखू लागलं. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी तपासणी केली असता, संबंधित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती निघाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईनं आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.