केंद्र सरकारच्या GST मंत्रिगटात अजित पवार यांचा समावेश
कोरोनावरील उपचारासाठीची औषधे, वैद्यकीय उपकरणे, लस यांच्यावरील GST कपातीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या 8 सदस्याय मंत्रिगटात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. GST परिषदेच्या 43 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत कोरोना प्रतिबंधक लस, औषध आणि इतर वैद्यकीय उपकरणं यांच्यावरील GST हटवण्याची मागणी प्रामुख्याने राज्य सरकारांकडून करण्यात आली. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी एक मंत्रिगट स्थापन करण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानंतर यामधील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हे या मंत्रिगटाचे समन्वयक असतील. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गोव्याचे परिवहन मंत्री मौविन गोदिन्हो, केरळचे अर्थमंत्री के. एन. बालगोपाल, ओडिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी, तेलंगणाचे अर्थमंत्री टी. हरिश राव आणि उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांचा यामध्ये समावेश आहे.