बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (13:59 IST)

राज्यातून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले जाणार -आपत्ती व्यवस्थापन समिती

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग आता जवळजवळ पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. आता राज्यात दररोज कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. दरम्यान, राज्यातील अर्थव्यवस्था झपाट्याने रुळावर येत आहे. व्यवसाय आणि रोजगार पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. 2 मार्चपासून मुंबई महानगर पालिकेने ही शाळांना कोरोनाच्या कालावधीपूर्वी पूर्ण क्षमतेने संस्था चालवण्याचे परिपत्रक जारी केले आहे. अशा परिस्थितीत राज्यात कोरोनाचे निर्बंध कायम ठेवण्याची गरज नाही . हे निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे .शुक्रवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्यातील सर्व निर्बंध उठवले जातील.
 
मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोनाशी संबंधित परिस्थितीचा तपशील मांडला.  या बैठकीत कोरोना कालावधीचे निर्बंध कायम ठेवण्याची गरज नसल्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना निर्बंध हटवण्यासोबतच स्थानिक परिस्थिती पाहता निर्बंध हटवण्यासंबंधीच्या आदेशात बदल करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समित्यांना असतील. 
 
लवकरच राज्यभरातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध हटवले जाणार आहेत. सध्या लागू असलेल्या नियमांनुसार हॉटेल-रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, जिम, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत. हे निर्बंध आता पूर्णपणे काढले जाण्याची शक्यता आहे. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीची अटही शिथिल केली जाऊ शकते किंवा हा नियम सरसकट हटवला जाण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री आणि टास्कफोर्सशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.असे ही सांगितले आहे.