शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (08:15 IST)

आईच्या डोळ्यासमोर तिन्ही भावंडं तलावात बुडाली..

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा गावालगत असलेल्या अंतरवाली येथील एका पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या तिन्ही पोरांना वाचवण्यासाठी आईनेही स्वत: तलावात उडी मारली. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंच्या धाडसाने मुलाच्या आईचे प्राण वाचवण्यात यश आले. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे खर्डा व परिसरावर शोककळा पसरली आहे. 
 
हि घटना गुरुवारी (६ ऑक्टोबर) रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. अहमदनगरच्या खर्डा येथे तलावात बुडून तीन भावंडांचा मृत्यू झाला आहे. सानिया सुरवसे, कृष्णा सुरवसे आणि दीपक सुरवसे असे या तिघांची नावे आहेत. खर्डा येथील हे बहिण भाऊ त्यांची आई रुपाली हिच्या सोबत कपडे धुण्यासाठी भूम कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तलावात गेले होते. त्याचवेळी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला.
 
आपल्या आईसह ही तीन मुलं कपडे धुण्यासाठी तलावाकडे आली होती. मात्र कपडे धुवत असताना सानिया पाय घसरून तलावातील पाण्यात पडली. सानिया पाण्यात बुडू लागल्याचे पाहतात दीपक, कृष्णा दोघेही तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र काही कळायचे आतच तिघेही बुडू लागले. हे पाहताच त्यांची आई रुपाली तिनेही पाण्यात उडी मारली, मात्र ती देखील पाण्यात बुडू लागली. त्याचवेळी आईने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांकडे वाचविण्यासाठी धावा केला. त्यात आईला वाचविण्यात यश आले असून, तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.