अमित शाह घेणार उद्धव ठाकरे यांची भेट
भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या अर्थात बुधवारी मुंबईत येत असून यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी ६ वाजता मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी अमित शाह २०१९ निवडणूक एकत्र लढण्यासंबंधी उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित असण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करत होते. पालघर पोटनिवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील संबंध कमालीचे ताणले होते. उद्धव ठाकरे युती तोडतील अशी चर्चा सुरु होती, मात्र तसं काही झालं नाही. भाजपा मात्र कर्नाटक विधानसभा तसंच पोटनिवडणुकीतील पराभवानंतर बॅकफूटवर जाताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून स्वत: अमित शाह उद्धव ठाकरेंसोबत युती कायम ठेवण्याबद्दल चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र शिवसेना काही झालं तरी एकला चलो रे ही भूमिका सोडणार नसल्याचं सांगितलं आहे.