शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मे 2022 (22:38 IST)

राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रावर अनिल परब म्हणाले.....

anil parab
राज ठाकरेंचं पत्रः उद्धव ठाकरे, सत्ता येते-जाते, आमचा अंत पाहू नका
 
 मशिदींवरील भोंग्याविरोधातील आंदोलनानंतर मनसेच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू झाली.
 
यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे संतापले असून, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून इशारा देणारं पत्र लिहिलंय.
 
"राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही," असं म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांवरील कारवायांचा निषेध नोंदवलाय.
 
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पत्रात काय म्हटलंय?
राज ठाकरेंनी पत्रात मनसैनिकांवरील कारवीचा निषेध करत म्हटलंय की, "सर्व देशबांदवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. 4 मे रोजी 'भोंगे उतरवा' आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!"
 
या पत्रातून राज ठाकरेंनी आरोप ही केलाय, ते म्हणालेत की, "गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीनं पोलीस बळाचा वापर करत आहे, ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?"
 
संदीप देशपांडेंवरील कारवाईंचा राज ठाकरेंनी विशेष उल्लेख करत म्हटलंय की, "आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत."
 
"महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत, हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहे," असंही राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलंय.
 
आंदोलन केल्यास कारवाई होतेच - अनिल परब
राज ठाकरेंच्या पत्रावर शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, "आंदोलन केल्यावर कारवाई होतेच. आम्हीही आंदोलनं केली, आम्हालाही कारवाई झाली. आंदोलन करताना दोन दिवस तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, असं बाळासाहेब सांगायचे."
 
"सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीच आलेला नसतो. सत्ता कुणाकडे द्यायची, हे दर पाच वर्षांनी जनता ठरवते. सत्तेचा अमरपट्टा कुणाकडेच नाहीय. दर पाच वर्षांनी निवडणुका होता, दर पाच वर्षांनी सरकार बसतं," असंही अनिल परब म्हणाले.
 
तसंच, ज्याला अयोध्येला जावं, त्यांनी जावं. प्रत्येकाला अधिकार आहे, असं परब राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर म्हणाले.
 
तर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
 
"जे सरकार 12-12 दिवस खासदार-आमदारांना जेलमध्ये ठेवतं, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. या सरकारविरोधात आम्ही लढतोय, त्यांनीही (राज ठाकरे) लढलं पाहिजे," असं फडणवीस म्हणाले.