चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे यांनी तीन हजार पुस्तके वापरत साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती
१४ एप्रिल अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. पुस्तकांसाठी भव्य असं घर बांधणाऱ्या या महामानवाने अवघ आयुष्य पुस्तक लिहिण्यात अन वाचनात खर्ची केलं अन देशाला एक परिपूर्ण असं संविधान दिलं. वाचाल तर वाचाल हा संदेश देत त्यांनी समाजाला वाचनाची प्रेरणा दिली. हाच धागा पकडत यंदाच्या जयंतीनिमित्त तब्बल तीन हजार पुस्तकांचा वापर करत साडेपाच हजार चौरस फुट शालेय मैदानात बाबासाहेबांची आकर्षक प्रतिकृती साकारत देव हिरे यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.
शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ता. चांदवड च्या प्रांगणात ही भव्य अशी कलाकृती साकारली असून त्यासाठी मुख्याध्यापक श्री.कृ.बा.लोखंडे, पर्यवेक्षक श्री.आ.वि. सोनवणे. यांच्या मार्गदर्शनातून हिरे यांनी ही कलाकृती दोन दिवसांत तब्बल बारा तास भर उन्हात उभं राहत आपली कलाकृती पूर्णत्वास नेली. यात तीन हजार पुस्तकांचा वापर झाला असून विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत वाचाल तर वाचाल हा संदेश देखील दिला आहे. याउपक्रमात चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून हर्षद गवळी, हेमंत मोरे, योगराज खैरणार या विद्यार्थ्यांनी तसेच सहाय्य्क शिक्षक श्री. अनिल बहिरम यांनी देव हिरे यांना विशेष सहकार्य केलं आहे.
नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांनी विविध सण उत्सव साजरे करणारे देव हिरे सर या उपक्रमाने आणखी प्रकाशझोतात आले असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संयम, एकाग्रता अन कलेची तपस्या त्यांच्या या कलाकृतीतून अधोरेखित होत असल्याचं अनेकांनी बोलून दाखवल.