मुख्यमंत्र्यांचे पीए आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञाताकडून व्हॉट्सअपवर धमकी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पीएला धमकीचा फोन आल्याचं समोर आला आहे. मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी देण्यात आली आहे. या अज्ञात व्यक्तीने काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी देण्यात आली आहे.
या अज्ञात व्यक्तीने मिलिंद नार्वेकर यांच्याकडे अनेक मागण्या केल्या आहेत. नेमक्या मागण्या काय आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. मिलिंद नार्वेकर यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत.