मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (22:24 IST)

वीजबिलांचे दरमहा १० हजारांवर ग्राहकांचे ‘चेक बाऊन्स’; ऑनलाईन वीजबिल भरण्याचे आवाहन

महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी दरमहा सुमारे १० हजार ५०० हजार धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा दंड पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे. ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध असली तरी अद्यापही सुमारे ४ लाख ५१ हजार वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. यामध्ये पुणे परिमंडलामधील सर्वाधिक १ लाख ८ हजार, भांडूप परिमंडल- १ लाख ४ हजार, कल्याण परिमंडल- ७३ हजार तसेच *नाशिक*, कोल्हापूर, बारामती, नागपूर परिमंडलातील २४ हजार ते २९ हजार ग्राहकांचा समावेश आहे. मात्र दरमहा सुमारे १० हजार ५०० ग्राहकांच्या वीजबिलांचे धनादेश अनादरित होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील १७५०, कल्याण- १७००, भांडूप- १५००, नागपूर- ११००, बारामती- ९०० व इतर परिमंडलातील ७० ते ८०० ग्राहकांचा समावेश आहे. या सर्व ग्राहकांना प्रत्येक वीजबिलासाठी ७५०/- रुपये बँक अडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५/- रुपये असे एकूण ८८५/- रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.
 
अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहे. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहे. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधीत रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून येत आहे. धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीजबिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीजबिलामध्ये थकबाकी दिसून येते.
 
महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करणे लघुदाब वीजग्राहकांसाठी घरबसल्या शक्य झाले आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबत सेवा उपलब्ध आहे. तसेच क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. तर क्रेडीटकार्ड वगळता सर्व ‘ऑनलाईन’द्वारे होणारा भरणा निशुल्क आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांचे बिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.