गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2020 (21:40 IST)

दगडूशेठ हलवाई गणपतीचे काश्मीरमध्ये दर्शन शक्य

काश्मीरमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. भारतीय लष्करातील ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी गुरेज सेक्टर कंजलवान या गावामध्ये साकारलेल्या गणेश मंदिरात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 
 
६ मराठा बटालियनचे प्रमुख कर्नल विनोद पाटील यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना पत्र लिहून जम्मू काश्मीरात दगडूशेठच्या गणरायाची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली. युवा शिल्पकार विपुल खटावकर याने दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती साकारली. 
 
“मंदिर उभारणीसाठी बटालियनच्या सर्व जवानांनी उत्साहाने योगदान दिले. कामाला सुरुवात करण्यात आली तेव्हा मंदिराच्या जागेवर जवळजवळ चार ते पाच फूट इतका बर्फ होता. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हा बर्फ १२ फुटांपर्यंत वाढत गेला. परंतु, जवानांनी मंदिराच्या कामासाठी श्रमदान आणि अर्थसहाय्य केले. चीड या झाडाच्या लाकडाचा उपयोग करून साकारलेले हे मंदिर भक्ती, जिद्द, चिकाटी आणि कलेचा सुबक संगम आहे,” असं कर्नल विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.