'डेक्कन क्वीन' ची संपूर्ण धुरा महिलांनी सांभाळली
पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणार्या बहुप्रतिष्ठित दख्खनची राणी अर्थात 'डेक्कन क्वीन' एक्सप्रेसची संपूर्ण धुरा शुक्रवारी महिलांनी यशस्वीरित्या सांभाळली. इंजिन- डब्याच्या जोडणीपासून गाडी चालवण्यापर्यंत ते टीसी व गार्डची जबाबदारी सांभाळण्यापर्यंत महिलांनी आपली भूमिका चोख निभावली. यावेळी लोको पायलट जयश्री कांबळे, गार्ड श्रद्धा तांबे, पॉईंट वुमेन राधा चलवादी, तसेच महिला कर्मचारी म्हणून सरिता ओव्हाळ, नम्रता दोंदे, आदींनी गाडीचे कामकाज पाहिले.
पुणे स्टेशनवरील फलाट एकवर शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता रेल्वे प्रवासी ग्रुपने कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. ठीक सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी डेक्कन क्वीन मुंबईकडे मार्गस्थ झाली. दरम्यान, संपूर्ण डेक्कन क्वीन महिलांकडे महिला दिवशी सोपवावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती.