शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (08:26 IST)

तुमच्या स्क्रिप्टनुसार आम्ही काम करायचं का; चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला सवाल

शिवसेना सध्या कोणीतरी दिलेल्या स्क्रीप्टनुसार काम करते. त्यामुळे आम्हीदेखील तुमच्या स्क्रीप्टनुसार काम करायचं का? असा थेट सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विचारला. तसेच सरकारने त्यांचे काम करावे, आम्ही आमचं काम करत राहू, असा सल्लाही पाटील यांनी दिला.कोथरुड मधील मुलींना ड्रेस वाटपाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
 
पाटील म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत. पण त्यांच्या जर-तरच्या वाक्यावरुन अटक होते.त्यापेक्षा संजय राऊत यांचे कोथळा काढू हे वाक्य भयंकर आहे.त्यावर मी फक्त एवढंच म्हटलं की, कोथळा काढायसाठी हातात जे शस्त्र घ्यावं लागतं, ते घेण्यासाठी तुमच्या दंडात तेवढी ताकद आहे का बघा? त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करत राहू,ते कुणीतरी दिलेल्या स्क्रिप्ट नुसार काम करतात.आम्ही देखील तसंच काम करायचं का? असा थेट सवाल त्यांनी यावेळी विचारला.
 
राजू शेट्टी यांच्या आंदोलनावर बोलता ते पुढे म्हणाले की,  देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात पंचनामे पूर्ण झालेले नसताना ही तातडीने मदत देऊ केली.आता नुकत्याच सांगली-कोल्हापूरमध्ये येऊन गेलेल्या पूरानंतर पंचनामे होऊनही जर पूरग्रस्तांना मदत मिळत नसेल, तर का आक्रमक होऊ नये? असा सवाल उपस्थित केला. तसेच कोविडमध्ये नुकसान झालेल्यांना राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केले,त्याचा एक रुपया ही मदत मिळालेली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.