शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2023 (08:25 IST)

खून करणाऱ्याला दुहेरी जन्मठेप वैजापूरच्या न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!

court
वैजापूर  : बैलगाडी आणि गाय चोरून नेताना विरोध करणाऱ्या एकाचा खून तर दुसऱ्याला गंभीर जखमी करणाऱ्याला वैजापूरस्थित जिल्हा व सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासिक ठरला आहे. कारण वैजापूर जिल्हा व सत्र न्यायालयात एकाच आरोपीला दुहेरी जन्मठेप सुनावली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
शंकर उर्फ लखन नंदू जगताप असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दामूभाऊ किसन महारनोर (६३, रा. डोमेगाव, ता. गंगापूर) यांची मलकापूर शिवारात गट क्रमांक २१ मध्ये शेतजमीन आहे. २६ सप्टेंबर २०१८ रोजी लखन जगताप याच ठिकाणी असलेल्या महारनोर यांच्या वस्तीवरून सकाळी १०.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान त्यांची बैलगाडी व गाय चोरून नेत होता. त्याला महारनोर यांनी विरोध केला. यामुळे चिडलेल्या लखनने बाजरीच्या पिकात त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. याच दरम्यान त्यांचा नातू दादासाहेब अण्णासाहेब महारनोर (१२) आजोबांना सोडविण्यासाठी तेथे आला. मात्र, लखनने त्याचा गळा आवळून एका पायावर पाय देत दुसरा पाय मुरगळला. एवढेच नाही तर त्याच्यावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या हल्ल्यात दामूभाऊ महारनोर मरण पावले.
 
यानंतर किशोर धोंडीराम महारनोर (२८, रा. डोमेगाव) यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी लखन जगताप याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली होती. हा खटला वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालला.
 
या प्रकरणात सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. त्यात जखमी दादासाहेब, उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी आणि अन्य एकाची साक्ष महत्वपूर्ण ठरली. यानंतर सुनावणीच्या वेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहिनुद्दिन एम.ए. यांनी समोर आलेल्या साक्षीपुराव्यांच्या आधारे आरोपी शंकर उर्फ लखन नंदू जगताप याला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद तसेच कलम ३९४ व सहकलम ३९७ अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
Edited by : Ratnadeep Ranshoor