सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (21:49 IST)

डॉ. कारभारी काळे यांची ‘बाटु’च्या कुलगुरुपदी नियुक्ती

राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.
डॉ. कारभारी काळे हे सध्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.
 
डॉ बाबासाहेब आंबेडकर  तंत्रशास्त्र  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलगुरु डॉ. अनिरुध्द पंडित यांच्याकडे  28 मार्च 2021 रोजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
डॉ. कारभारी काळे  (जन्म 2 ऑगस्ट 1962) यांनी  भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था, नागपुरचे संचालक प्रा. प्रमोद पडोळे आणि महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते.
समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. कारभारी काळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.