रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (20:36 IST)

नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त

पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवणारा ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याचा नाशिकमध्ये असलेला ड्रग्ज निर्मितीचा कारखाना मुंबई पोलिसांनी उध्वस्त केला आहे. या कारखान्यात कोट्यवधीचे ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ललित पाटील हा मूळचा नाशिकचा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिकच्या घरी देखील पोलिसांनी झाडाझडती घेतली. तर कारखान्यात सापडलेल्या ड्रग्जची किंमत 250 कोटीच्या आसपास आहे.गेल्या दोन दिवसापासून ही कारवाई सुरू होती. मात्र याबाबत स्थानिक पोलिसांना कुठली माहिती नव्हती. 
 
नाशिकमध्ये साकीनाका पोलिसांची दोन दिवस कारवाई सुरु होती. नाशिकमध्ये श्री गणेशाय इंडस्ट्रीजच्या नावाने हा कारखाना होता. येथे ही ड्रग्ज निर्मिती केली जात होती. या कारखान्यात पोलिसांनी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणार 150 किलो कच्चा माल सापडला आहे. हा कारखाना पोलिसांनी उद्धवस्त केल्यानंतर कंपनी मालकासह कामगारांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर भूषण पाटील ने कारखान्या मधील तयार माल व सामुग्री लपास केली असावी अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली. यावेळी घटनास्थळावरून एक किलो आठशे ग्रम एम डी व तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा कोट्यावधी चा माल हस्तगत केला आहे.
 
दुसरीकडे पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा ड्रॅग माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्यानंतर त्याला शोधण्यासाठी विविध पथके पोलिसांनी रवाना झाली आहेत.
 
असे आहे ललित पाटील याचे कारनामे
कुख्यात ड्रग्स माफिया ललित पाटील अनेक कारनामे केले आहे.ललितला तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. पण पुढे प्रकृतीच्या कारणाने त्याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आले. गेल्या दीड वर्षांपासून तो ससून रुग्णालयात कैद्यांसाठी असलेल्या १६ नंबरच्या वॉर्डमध्ये उपचार घेत होता. विशेष म्हणजे त्याला आधीच डिस्जार्ज द्यायला पाहिजे होता. मात्र ससूनमध्ये राहून ड्रग्स रॅकेट चालविण्यासाठी त्याने डॉक्टरांशी हातमिळवणी केल्याचे उघड झाले आहे.

अशा पद्धतीने काम करून घेण्यासाठी तो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा मध्यस्थ म्हणून वापर केला. हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा काही साधासुधा नाही. त्यानेही चांगली माया जमवलेली आहे. तो ब्रांडेड कारमधून रुग्णालयात येतो.

त्यानेच अतिवरिष्ठांना मॅनेज केले आणि ललित पाटीलला ससूनमध्ये ठेवण्यासाठी दररोज 70 हजार रुपये मिळतील असे सांगितले. त्यानुसार ललित पाटील या रुग्णालयातील अतिवरीष्ठ डॉक्टरांना दररोज 70 हजार प्रमाणे आठवड्याचे पैसे रोख द्यायचा. या पैशांच्या जोरावर ललित पाटील ससून रुग्णालयातून मेफेड्रॉन ड्रग्सची तस्करी करायचा, असे उघडकीस आले आहे. या वॉर्डात त्याची पूर्ण बडदास्त ठेवण्यात आली . विशेष म्हणजे ड्रग्स नेटवर्क संपर्कात ठेवण्यासाठी त्याच्याकडे सव्वादोन लाख रुपयांचे मोबाईल होते.

Edited By - Ratnadeep Ranshoor