समुद्रात क्रूझवर मध्यरात्री सुरू होती ड्रग्ज पार्टी, एनसीबीच्या धाडीत 10 जण ताब्यात
मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण पथकानं शनिवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. समुद्राच्या मध्यभागी एका क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर धाड टाकत 10 जणांना एनसीबीनं ताब्यात घेतलं. यामध्ये एका अभिनेत्याच्या मुलाचा समावेश असल्याचं वृत्तामध्ये म्हटलं आहे.मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवर ही पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं एनसीबीचे अधिकारी प्रवासी बनून क्रूझवर गेले. क्रूझ समुद्राच्या मध्यभागी गेल्यानंतर ही पार्टी सुरू झाली होती, अशी माहिती एनसीबीनं दिली.
ड्रग्जचं सेवन सुरू केल्यानंतर एनसीबीच्या पथकानं या सर्वांना रंगेहाथ अटक केली. त्यामध्ये एका अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश होता. शनिवारी निघालेली ही क्रूझ सोमवारी मुंबईला परतणार होती, अशी माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी कारवाई केलेली क्रूझ काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. तसंच या पार्टीसाठी क्रूझचं तिकिट 80 हजार रुपये एवढं असल्याचंही काही माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे.