बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (16:05 IST)

फुटपाथवरील झाडांवर फटाक्यांचे स्टॉल ; झाडांचे नुकसान

स्पाईन रोड ते गवळीमाथा रस्त्यावर फुटपाथवरील झाडांवर अनधिकृतपणे फटाक्यांचे स्टॉल थाटले आहेत. त्याच्या खाली 10 झाडे वाकून गेली आहेत. काही महिन्यापूर्वीच ही झाडे लावली होती. झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे.

पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात असताना पर्यावरणाचे नुकसान करून फटाक्याची विक्री केली जात आहे. स्पाईन सिटी मॉलकडून गवळी माथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर झाडांवर फटाक्यांचे स्टॉल थाटले आहेत. भर चौकात झाडांवर हे स्टॉल उभारले आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. फटक्यांचे स्टॉल लावण्यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगीही घेतली नाही. अनधिकृतपणे स्टॉल उभारले असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे.

याबाबत बोलताना वृक्षप्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले, “स्पाईन सिटी मॉलकडून गवळी माथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर यंदा  झाडे लावली आहेत. चाफ्याची झाडे आहेत. त्यावर फटाक्यांचे स्टॉल लावले आहेत.  पत्र्याखाली झाडे वाकून गेली आहेत. स्टॉलसाठी महापालिकेची परवानगी घेतली नसल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस ठाण्याच्या 200 मीटर अंतरावर स्टॉल लावून फटाके विकले जात आहेत. त्यांचा व्यवसाय आहे हे मान्य पण, नवीन लावलेल्या झाडावर स्टॉल थाटले आहेत. त्यासाठी दहा झाडे तोडली आहेत”.

“झाडासाठी खड्डा, माती टाकायला करदात्यांचे पैसे गेले आहेत. झाडाबाबत लोक खूप असंवेदनशील झाले आहेत.  पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यापेक्षा आहे ती झाडे तोडली जातात. प्रदूषण करणारे फटाके विकले जातात हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे. स्मार्ट सिटी होताना पर्यावरणाकडे लक्ष दिले पाहिजे. पण, त्याच्या उलट चालू आहे. भर चौकात परवानगी कशी दिली. झाडांवर स्टॉल उभारण्याची परवानगी कोणी दिली. कोणाच्या आशीर्वादाने हे चालले आहे. पोलीस प्रशासनाने या अनधिकृत स्टॉलवर कारवाई करावी. पर्यावरणाचे नुकसान करू नका एवढीच आमची मागणी आहे, असे राऊळ म्हणाले.‘क’ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे म्हणाले, “फटाक्यांचे स्टॉल लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नाही. विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे”.