मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (21:23 IST)

सिटीलिंकसाठी आता ९ महिला तिकीट तपासनीस आणि १० महिला वाहक

नाशिक महापालिका परिवहन सेवा (सिटीलिंक) बससेवेत नऊ महिला तिकीट तपासनीस, तर दहा महिला वाहक दाखल झाल्या आहेत. महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेने तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, सोबतच सेवेत पुरुषांप्रमाणेच महिलांनाही स्थान देण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. बसमधील महिला प्रवाशांच्या तिकिटाची तपासणी करण्यासाठी आता महिला तपासनीस (चेकर) नियुक्त केल्या आहेत.
 
पहिल्या टप्प्यात २५ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.त्यांपैकी नऊ महिला चेकर १ एप्रिलपासून पासून सेवेत रुजू झाल्या आहेत. बसमध्ये प्रवास करताना प्रथम तिकीट घ्यावे लागणार आहे. महानगर परिवहन सेवेने (सिटीलिंक) पुरुषांप्रमाणे महिलांनाही सेवा करण्यासाठी प्राधान्य देताना, बसमध्ये पुरुष वाहकांप्रमाणे ३५ महिला वाहकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांपैकी २५ महिलांच्या कागदपत्र तपासणीचे काम पूर्ण झाले असून, दहा महिला वाहक सेवेत दाखल झाल्या आहेत. महिलांना वाहक म्हणून प्रशिक्षण देण्याचे काम महापालिका सिटीलिंक कार्यालयातच पार पडले. सेवेत दाखल होण्यासाठी तपासणीस म्हणून पदवीधर महिलांना, तर वाहक म्हणून बारावीच्या पुढील शिक्षण घेतलेल्या महिलांना प्राधान्य देण्यात आहे.
 
”पंचवीसपैकी दहा महिला वाहक सेवेत रुजू झाल्या आहेत. उर्वरित १५ महिला वाहक सोमवारपासून रुजू होणार आहेत. पुरुषांप्रमाणे महिलांना सिटीलिंकच्या सेवेत स्थान देण्यात आले आहे.”