राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घालणार
अयोध्येत जाऊन शरयू नदीच्या किनार्यावर महाआरती केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिरासाठी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घालणार आहेत. 24 डिसेंबरला चंद्रभागेच्या तीरावर महाआरती करत पंढरपुरात शिवसेना शक्ती प्रदर्शन करणार आहे. या निमित्ताने मुंबई ते पंढरपूर दरम्यान धावणार्या विठाई या नव्या एसटी सेवेचा शुभारंभही त्यांच्या हस्ते होणार आहे.
राम मंदिराबाबत निर्णय होत नसेल तर गप्प बसून चालणार नाही अशी भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नावर आक्रमक होण्याचा इशारा दिला आहे. अयोध्येत राममंदिर बांधण्याची सुबुद्धी सरकारला द्या, असे साकडे ते विठ्ठलाला घालणार आहेत. राममंदिर बांधण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. राममंदिराचा मुद्दा आणखी पुढे नेण्यासाठी पंढरपुरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेच्या मंत्री आणि प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली.