दसरा मेळाव्यासाठी मी फारसा उत्सुक नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरें, प्रकाश महाजन यांचा गौप्यस्फोट
दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात वाद सुरू होता. कायदा सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली. मात्र त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. ज्याठिकाणी उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली. शिंदे-ठाकरे गटातील या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला दिला होता मात्र तो ऐकला नसल्याने ही वेळ आली असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी गौप्यस्फोट केला.
मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, दसरा मेळाव्याबाबत आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंनी हा मेळावा घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर राज ठाकरेंना मी विनंती केली होती. तेव्हा वर्षानुवर्षे दसरा मेळावा-बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे आणि यात समीकरणात आपण जाणं हे कोतेपणाचं लक्षण ठरेल. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मी फारसा उत्सुक नाही असं राजसाहेबांनी म्हटलं असे त्यांनी सांगितले.
Edited by : Ratandeep Ranshoor