सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 14 जानेवारी 2023 (13:39 IST)

काहीतरी शिजतंय असं मी बाळासाहेब थोरातांना आधीच सांगितले होते, अजित पवारांचा गौप्यस्फोट

ajit pawar
नाशिक पदवीधर निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी माघार घेत स्वत:च्या मुलाला अपक्ष उमेदवार म्हणून उभं केले. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारच नाही. त्यात आता या राजकीय घडामोडीनंतर मविआत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काहीतरी शिजतंय असं मी बाळासाहेब थोरातांना आधीच सांगितले होते असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. 
 
अजित पवार म्हणाले की, असं काहीतरी कानावर येतेय, तुम्ही काळजी घ्या, काही वेगळं शिजतंय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरात यांना पूर्णपणे आदल्यादिवशी सांगितले होते. पण ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, आमच्या पक्षाची जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडू, उद्या डॉ. तांबेंचाच अर्ज भरणार आहेत असं बाळासाहेबांनी मला म्हटल्याचं चांगलं मला आठवतंय असं त्यांनी सांगितले. त्यामुळे सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून बाळासाहेब थोरातांनी अजित पवारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. 
 
कोण कुठे जाणार हे सांगायला मी ज्योतिषी नाही. मला हे बघायचंही कारण नाही. मी माझ्या पक्षाचं काम करणारा कार्यकर्ता आहे. कुणी कुठल्या पक्षात जावं हा वैयक्तिक अधिकार आहे. कुठल्याही पक्षाचं काम करताना विश्वासार्ह महत्त्वाचा आहे. विश्वास गमावू नये याची काळजी घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. 
 
नाशिकमध्ये जे घडले त्याचे श्रेय भाजप घेत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यगिरीमुळे नाशिकमध्ये हे घडले असे सांगितले जाते. हाती सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की, असे चाणक्य पायलीस पन्नास निर्माण होतात. 

Edited By - Ratnadeep Ranshoor