बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 एप्रिल 2021 (15:55 IST)

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार असेल- नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंढरपूरच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असता त्यांनी इंदापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोलेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.
 
इंदापूर तालुक्यात काँग्रेसला मानणारा वर्ग आहे. गावागावात काँग्रेसला मानणारे लोक आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरचा आमदार काँग्रेसचा असेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
जे कोणी काँग्रेसला मानणारे आहेत त्यांच्यासाठी पक्षात जागा खाली आहे. मात्र संधी साधूसाठी जागा नाही. ज्यांना एक पक्ष म्हणून काम करायचं आहे. सत्तेसाठी नाही अशांना काँग्रेसचं दार उघडं आहे. 2014 मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार आहे, असा दावा नाना पटोलेंनी केला आहे.
 
सध्या इंदापूरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. या जागेवर राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. आता नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष अटळ आहे. इंदापूरमधील काँग्रेसचे माजी आमदार आणि आत्ताचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही जागा राष्ट्रवादीला सोडल्याने भाजपत प्रवेश केला होता.