आमदारांना घरे देण्याचा निर्णय झालेलाच नाही
सर्व आमदारांना मुंबईत हक्काची घरं देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली होती. या निर्णयावरुन राजकारण तापले असतानाच आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारांना घरे देण्याचा निर्णय झालेलाच नाही, त्यामुळे त्याची अंमलबजावणीही होणार नसल्याचे सांगितले. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे सरकारने या निर्णयाविरोधात घुमजाव केले की, काय अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
अशोक चव्हाण यांनी आज सपत्नीक उस्मानाबादेत तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी माध्यमांनी त्यांना आमदारांच्या घरांसदर्भात प्रश्न विचारले असता चव्हाण म्हणाले, आमदारांना घरे देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात कोणत्याही आमदारांची मागणी नव्हती. त्यामुळे त्यावर अंमलबजावणीही केली जाणार नाही. विरोधक विनाकारण या मुद्यावरुन राजकारण करत आहेत.
दरम्यान, आता अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या आमदारांच्या घरांच्या निर्णयावरून घुमजाव घुमजाव केल्याचे बोलले जात आहे.