बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जानेवारी 2024 (11:31 IST)

महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन

Maharashtra Police
2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजारा केला जातो.
 
पोलिसांचे आयुष्य सोपे नसते. ड्युटीवर असताना, त्याच्यावर जे काही दडपण आणि तणाव असतं ते विसरून ते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असतात. पोलीस दलाला लागणारे प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे, सुविधा आणि इतर विविध सोयी याशिवाय त्यासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धैर्य. महाराष्ट्र पोलीस दलात ते आहे.
 
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन हा महाराष्ट्र पोलीस दलाच्या वैभव आणि तेजाबद्दल आहे. 

महाराष्ट्र पोलीस सेवा, पूर्वी बॉम्बे राज्य पोलीस, भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जबाबदार आहे. याचे प्रमुख पोलीस महासंचालक आहेत, त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
 
महाराष्ट्र हे आकारमानाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. राज्यातील सुमारे 35 जिल्हा पोलिस तुकड्यांसह हा देशातील सर्वात मोठा पोलिस विभाग आहे. महाराष्ट्र पोलीस विभागात अंदाजे 1.95 लाख पोलीस कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये 150,000 महिलांचाही समावेश आहे.
 
महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास बघायला गेलो तर पहिली नोंद 1661 साली झाल्याची आढळते. त्यावेळी पोर्तुगीजांनी पोलीस चौकीची स्थापना करुन भागात कायदेशीर अंमलबजावणीची मूलभूत संरचना तयार केली. नंतर 1672 साली सात बेटांचे रक्षण करण्यासाठी भंडारी ब्रिगेड नावाची फौज नेमली गेली जी अधिक शिस्तबद्ध होत महाराष्ट्र पोलीस दलाचा उगम झाला.
 
1936 मध्ये सिंध प्रांत पोलीस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले. पुढे 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे राज्य पोलीस असे ठेवले गेले. राज्य पुनर्गठन अधिनियम 1956 नंतर मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन गुजरात पोलीस, म्हैसूर पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस अशी विभागणी झाली. अखेर 2 जानेवारी 1961 साली अधिकृतरीत्या महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली.