सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , शनिवार, 25 जानेवारी 2020 (13:29 IST)

महापालिकेचा विधान सल्लागार 50 हजारांची लाच घेताना जेरबंद

आईच्या जागेच्या कर आकारणीसाठी नाव लावण्याच्या प्रलंबित प्रकरणावर तक्रारदारांच्या बाजूने फेरअभिप्राय देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर महापालिकेतील विधान सल्लागार अरूण नागनाथ सोनटक्के (वय 39, रा. दहिटणे, ता. उत्तर सोलापूर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
 
यातील तक्रारदारांच्या आईची सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागात जागा असून सदर जागेच्या   कर आकारणीसाठी नाव लावणकरिता अर्ज महानगरपालिकेकडे दिला होता. परंतु कर आकारणी विभागाने ते प्रकरण कायदेशीर अभिप्राय देण्यासाठी विधान सल्लागार सोनटक्के यांच्याकडे पाठवले होते. सदर प्रकरणाबाबत तक्रारदार हे विचारपूस करण्यासाठी सोनटक्केयांच्या कार्यालयात गेले असता तक्रारदार यांच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी सोनटक्के यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाच मागणी करण्यात येत असल्याची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्यावरून सदर तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये  तक्रारदार यांनी पंचासमक्ष विधान सल्लागार सोनटक्के यांची भेट घेतली असता तक्रारदार यांच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती रक्कम शुक्रवारी कोर्टाजवळ घेऊन येण्यास सांगितले होते. त्यावरून आज विधान सल्लगार सोनटक्के यांच्याविरुध्द कोर्टासमोर लाचेचा सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून सोनटक्के यांनी 50 हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
या प्रकरणी सोनटक्के यांच्याविरूध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची र्कावाही सुरू आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, पोलीस कर्मचारी श्रीरंग सोलनकर, नीलकंठ जाधवर, चंद्रकांत पवार, पद्मानंद चंगरपलू, सिध्दराम देशुख, श्याम सुरवसे यांनी केली.