शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जून 2023 (08:19 IST)

नाशिक: फायनान्स कंपनीच्या दोन वसुली एजंटवर ज्वलनशील पदार्थाने हल्ला

crime
एका खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीसाठी गेलेल्या दोघांवर ज्वलनशील पदार्थ टाकून हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संशयित सुनील देशमुख (रा. दातीर मळा, अंबड) याने बजाज फायनान्स या कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्याचे कर्जाचे हप्ते थकल्याने वसुली एजंट गणेश बापूराव फाफळे (३४, रा.विडी कामगार नगर), किरण भास्कर फाफळे (४०, रा.गणेश चौक ) हे दोघे देशमुख अंबड औद्योगिक वसाहतीत काम करत असलेल्या कंपनीच्या बाहेर जाऊन त्यांनी देशमुख याला पैशाच्या मागणीसाठी बाहेर बोलाविले.

दरम्यान गणेश फाफळे यांनी त्याच्याकडे थकीत पैसाची मागणी केली असता देशमुख याने त्यांना शिवीगाळ करत बॉटलीमध्ये असलेला ज्वलनशील पदार्थ गणेश फापळे व त्यांच्या सोबत असलेले त्यांचा साथीदार किरण फाफळे यांच्या अंगावर टाकले यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
 
त्यांना पाथर्डी फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor