गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (20:50 IST)

Omicron: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा पुन्हा बंद होणार? शिक्षणमंत्री काय म्हणाल्या?

दीपाली जगताप
महाराष्ट्रात पहिली ते दहावीच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. परंतु ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबतच्या निर्णयाचा पुनर्विचार राज्य सरकार करू शकतं असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, "सरसकट सर्व शाळा आम्ही बंद करणार नाही. पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देऊ. ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येचा आढावा घेऊन निर्णय घेतले जातील."
 
देशात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशातील 213 ओमिक्रॉन रुग्णांपैकी 54 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातून आढळले आहेत.
 
नवी मुंबईतील घणसोली येथील एका शाळेत 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर शाळेतील इतर जवळपास 1 हजार विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
 
ओमिक्रॉनमुळे पुन्हा शाळा बंद?
वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना घणसोलीतील शाळेचंही उदाहरण दिलं.
 
"आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवतोय. ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढल्यास शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो." असंही त्या म्हणाल्या.
 
राज्य सरकारने लागू केलेल्या SOP नुसार शाळा, महाविद्यालय सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने अंतिम निर्णय घ्यायचा आहे.
 
"ओमिक्रॉनच्या परिस्थितीवरही स्थानिक प्रशासनाने लक्ष ठेवावं. त्यानुसार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो." असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
 
केंद्र सरकारची सूचना
केंद्र सरकारनेही ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या पाहता काही राज्यांंसाठी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत.
 
केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सर्व राज्यांच्या सरकारला पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंट धोकादायक असून सरकारने खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावं अशी सूचना केली आहे.
 
राज्यांनी स्थानिक पातळीवर पॉझिटिव्हिटी रेट आणि ओमिक्रॉन रुग्णसंख्या वाढत असल्यास तात्काळ निर्णय घ्यावे.
 
लोकांची गर्दी होणार नाही हे पहाणं, कंटेनमेंट झोन तातडीने जाहीर करणं, संपर्कातील लोकांना शोधणं अशा प्रक्रिया वेगाने राबवाव्या असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.