शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (21:00 IST)

"आपलं नाणं मार्केटमध्ये खणखणीत चालतंय", काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

supriya sule
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल, गुरुवारी शिर्डीत आले होते. भाजपच्या वतीने शिर्डीतील काकडीत विविध सरकारी योजनांचे लाभार्थी आणि शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मोदींनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र डागलं होतं. परंतु आता ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं.
 
महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच शरद पवार साहेबांवर! त्यांचं स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय, असं सुळे म्हणाल्या.
 
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते बरीच वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. ते ज्या सरकारमध्ये मंत्री होते, त्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल मोदींनी विचारला होता. त्याला सुप्रिया सुळे यांनी आज, शुक्रवारी सिंधुदुर्गमधील दौऱ्यात उत्तर दिले.
 
मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला. महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच पवार साहेबांवर. त्यांचे स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे, जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय. त्यामुळे महाराष्ट्रात कोणी आलं तरी पवारांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही, असं सुळे म्हणाल्या. अगोदर पंतप्रधान राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे; ते यावेळी म्हणाले नाहीत. त्यामुळे यावेळी त्यांचे आरोप बदलले, असा टोलाही सुळे यांनी लगावला.
 
यावेळी सुप्रिया सुळे यांनी ड्रग्ज प्रकरणावरही भाष्य केले. ड्रग्ज प्रकरण हा राजकीय विषय नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री रोज सांगताहेत की आम्ही एक्स्पोज करणार. मात्र हा विषय सामाजिक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी शब्द दिला होता की ते यात लक्ष घालतील, परंतु, अजूनही त्यांनी यात लक्ष घातलेला दिसत नाही. त्यामुळे आता सर्वच बाहेर येऊद्यात, असं आव्हानही सुळेंनी दिलं.