शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सासरच्या मंडळींवर विवाहितेची फिर्याद, विवाहितेला पंचांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचेही आदेश

राज्यात पुन्हा जातपंचायत आणि त्याचा अमानवी छळ समोर आला आहे. सासरच्या मंडळींवर कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता म्हणून जालना जिल्ह्यातील एका २८ वर्षीय पीडितेसह तिच्या कुटुंबियांना वैदू जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले होते. हे सर्व प्रकरण इतक्यावरच थांबले नाही, पंचांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचेही आदेश पंचायतीने दिले होते. सोबतच पीडितेच्या बहिणीचे ठरलेले लग्न तोडण्यात आल्याचा हिडीस प्रकार घडला असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित सहा पंचांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
जालना जिल्ह्यातील राजूर येथील पीडितेचे ६ नोव्हेंबर २००९ ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील ज्ञानेश्वर राजे याच्यासोबत वाजत गाजत  लग्न झाले होते. काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून मोटारसायकल घेण्यासाठी पन्नास हजारांची मागणी करण्यात येऊ लागली. ती देण्यास असमर्थता दाखविल्यानंतर पीडितेला मारहाण करण्यात आली. मुलीने माहेरी या त्रासाबाबत माहिती दिल्यानंतर कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर जात पंचायतीने नवर्‍याचे दुसरे लग्न लावून दिले. पंचायतीने पीडितेसह तिच्या कुटुंबियांना बहिष्कृत केले. 
 
जातीची बदनामी केली असल्याने जातीबाहेर काढण्यात आल्याचे पंच तात्या रामा शिवरकर, अण्णा मल्लू गोडवे यांनी जाहीर केले. ही ‘मोगलाय माल’ आहे, अशा शब्दात पीडितेची बदनामी करत तिला लग्न मंडपातून बाहेर काढले. ही महिला जात पंचायतीसाठी कलंक आहे, असे सांगण्यात आले. तिच्या बहिणीचे ठरलेले लग्न पंचायतीने मोडले. या प्रकरणी पंच तात्या रामा शिवरकर, अण्णा गोडवे, मोतीराम चव्हाण, शामराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, तात्या ठिदे आणि दालीरामा लासुण यांच्याविरुद्ध सामाजिक बहिष्कार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आजही जात पंचायत फार मोठ्या प्रमाणत लोकांना त्रास देत आहे असे समोर आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने लवकरच कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संस्था आणि समाजसेवक नागरिक करत आहेत.