सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2022 (18:21 IST)

संजय राऊत आणि रवी राणांचा एकत्र जेवतानाचा फोटो व्हायरल

राणा दाम्पत्याला 'मिस्टर अँड मिसेस बंटी-बबली' असं म्हणणाऱ्या संजय राऊतांचा आणि रवी राणांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
 
राजकारणात कुणीच नेहमीसाठी शत्रू नसतं आणि कुणी नेहमीसाठी मित्र नसतो असं म्हणतात. पण अगदी काही दिवसांआधीच एकमेकांवर सडकून टीका करणारे लोक एकत्र जेवताना पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
 
थेट शिवसेनेलाच शिंगावर घेणाऱ्या राणा दाम्पत्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. लेह येथे खासदारांची बैठक होत आहे त्या बैठकीसाठी खासदार नवनीत राणा देखील आल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील आहे.
 
आमदार रवी राणा आणि संजय राऊत यांचा एकत्र जेवण करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.
ravi rana sanjay raut
आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसेवरुन अख्खे राज्य डोक्यावर घेतले होते. उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसेचे वाचन करणार असे रवी राणा- नवनीत राणा यांनी म्हटले होते. त्यानंतर राज्यात बराच गदारोळ झाला होता.
 
नवनीत राणा आणि रवी राणांना पोलिसांनी राजद्रोहाच्या कायद्याच्या उल्लंघनासाठी अटक केली होती.
 
रवी राणा आणि नवनीत राणांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून रान उठवले होते. जर मशिदीवरील भोंगे काढले नाही तर त्यासमोर हनुमान चालिसा लावा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्यानी देखील हा मुद्दा उचलून धरला.
 
नवनीत राणा तर म्हणाल्या की जर भोंगे हटवले नाही तर थेट उद्ध ठाकरेंच्या घरासमोरच जाऊन आम्ही हनुमान चालिसा म्हणू. त्यांच्या या कृत्याला विरोध झाला आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि राजद्रोहाचे कलम लावले.
 
जेव्हा नवनीत राणांची कोठडी संपली आणि त्यांना जामीन मिळाला तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंनाच त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान केले.
 
इतक्या अनेक गोष्टी घडलेल्या असताना रवी राणा आणि संजय राऊतांचा एकत्र जेवतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा होऊ लागली आहे.