मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (21:27 IST)

'त्या’ वाहनांचा ७ जून रोजी होणार जाहीर ई-लिलाव

प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा ७ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे. याअनुषंगाने थकीत कर असलेल्या वाहन मालकांना ६ जून पर्यंत वाहन कर व पर्यावरण कर भरण्यासाठी संधी देण्यात येत आहे, अशी माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
 
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, या जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी ३१ मे ते ५ जून २०२२ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेत स्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे ६२ हजार २०० रूपये रक्कमेचा RTO,NASHIK या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सह नाव नोंदणी करून प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच या जाहीर ई-लिलावात ४२ वाहनांचा लिलाव होणार असून बस, ट्रक, टॅक्सी, हलकी मालवाहू वाहने, व ऑटोरिक्षा या वाहनांचा समावेश आहे. या लिलाव प्रक्रियेत उपलब्ध जीएसटी धारकांनाच सहभाग घेता येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी सांगितले आहे.
 
वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखली अटकवून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांना कर अदा करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत पत्‍त्यावर पोचदेयक टपालाने नोटीस देण्यात आली आहे. लिलाव करण्यात येणारी वाहने नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक पेठरोड येथील राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा, सिन्नर बस डेपो व बस स्टँड, बोरगाव सिमा तपासणी नाका, येवला बस डेपो, पिंपळगाव बसवंत बस डेपो येथे पाहणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
या जाहीर ई- लिलावाची प्रक्रिया कोणतेही कारण न देता तहकूब करण्याचा अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसुली अधिकारी यांना देण्यात आला आहे. सदरचा जाहीर ई-लिलाव ७ जून रोजी www.eauctiom.gov.in या संकेत स्थळावर सकाळी ११ ते ४ या कालावधीत होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे उपलब्ध करून देण्यात आली असून वाहने जशी आहेत तशी या तत्वावर जाहीर ई- लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे, असेही माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.