सोन्याच्या मण्याचा पाऊस
राज्यात सर्वत्र सध्या पावसाचा जोर असताना राज्यात एका जागी सोन्याचा पाऊस पडतोय असं सांगितल्यास आपल्याला धक्काच बसेल. असंच काहीसं घडलं बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-औरंगाबाद- नागपूर महामार्गावर. येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास महामार्गाच्या कडेला काहींना सोन्याच्या मण्यासारखे दिसणारे काही मणी पडलेले आढळले. काही क्षणातच बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अनेकांनी मणी जमा करण्यासाठी धाव घेतली.
महामार्गाच्या कडेला विखुरलेले सोन्याचे मणी गोळा करण्यासाठी लोक गर्दी करत होते त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. हे मणी ज्याला दिसले त्यांनी उचलण्यासाठी लगबग केल्यामुळे काही वेळ वाहतूक सुद्धा थांबलेली होती.
सोन्याच्या मण्याची माहिती मिळाल्यावर अनेकांनी रस्त्याच्या कडेला पडलेले मणी पाहण्यासाठी धावपळ केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि हे मणी सोन्याचे आहेत का याची शहानिशा केली. तेव्हा मणी सोन्याचे नसून वेगळ्याच धातूचे असल्याचे कळाले. महामार्गावरून जाताना एखाद्या महिलेच्या गळ्यातील पोत तुटून रस्तावर विखुरले गेले असल्याचे लक्षात आले. मात्र या घटनेमुळं महामार्ग बराच वेळ ठप्प राहिला.
काहींनी महिलेच्या गळ्यात असलेली एखादी पोत तुटून पडली असेल तर काहींनी चोरट्यांकडून मणी फेकूले गेले असतील असे तर्क वितर्क लावले जात होते. नंतर कळले की हे सापडलेले मणी सोन्याचे नव्हते तर सोन्यासारखे दिसणारे नकली होते तेव्हा अनेकांची निराशा झाली.