गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (17:02 IST)

'ती' एतिहासिक मुलाखत आता २१ फेब्रुवारीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची येत्या बुधवारी (दि. २१)  प्रकट मुलाखत घेणार आहेत. यापूर्वी ही मुलाखत दि. ३ जानेवारीला होणार होती. मात्र कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्राला या मुलाखतीची उत्सुकता होती. अखेर ही मुलाखत २१ फेब्रुवारीला पुण्यात सांयकाळी ५ वाजता बीएमसीसी महाविद्यालयात मुलाखत होणार आहे. 
 
या प्रकट मुलाखतीमधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज हे आयत्या वेळी थेट प्रश्न विचारणार आहेत. प्रश्नांची कोणतीही कल्पना शरद पवार यांना आधी देण्यात येणार नसून राजकारण, समाजकारणासह पवारांशी संबंधित अनेक विषयांवर राज रोखठोक प्रश्न विचारतील अशी संकल्पना यामागे आहे. पवारांचा राजकारण प्रवेश, वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्यानंतर खंजीर खुपसल्याची मिळालेली ‘पदवी’, काँग्रेसमधून बाहेर पडणे, सोनियांना केलेला विरोध, हुकलेले पंतप्रधानपद, कृषीमंत्री ते संरक्षणमंत्री प्रवास, मुख्यमंत्रीपदाच्या काळातील अवघड निर्णय, चित्रपट, साहित्यिकांशी जवळीक, समाजकारण, बारामती कशी घडवली येथपासून ते नरेंद्र मोदींशी असलेली जवळीक व मोदींचे राजकारण तसेच पवारांनी आजारपणाचा सामना कसा केला येथपासून काका-पुतणे संबंध, सुप्रियाची वाटचाल तसेच राष्ट्रवादीचे भवितव्य अशा प्रश्नांची चौफेर गोलंदाजी करण्याची संधी राज यांना मिळणार आहे.