राज्याच्या गृहनिर्माण खात्यातही वसुली गँग सुरू : किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केला आहे. राज्याच्या गृहनिर्माण खात्यातही वसुली गँग असून एक मोठं रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक आरोप सोमय्या यांनी केला आहे. "गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, महापालिकेमध्ये १०० बिल्डरची यादी, १०० आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रविण कलमे नावा व्यक्ती हा आव्हाडांचा राईट हँड गेले काही महिने वसुली गँग चालवत आहे", असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विट करुन माहिती दिली आहे.
गृहनिर्माण विभागातील वसुली रॅकेट संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केल्याचीही माहिती सोमय्या यांनी दिली आहे. पोलिसांकडे या संपूर्ण वसुली रॅकेट संदर्भात पुरावे देखील सादर केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात सध्या १०० रुपये प्रति स्वेअरफूट असा एसआरए, म्हाडा आणि बिल्डरांसाठी दर चालत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. "गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रविण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरए मध्ये 100 बिल्डर्सच्या विरोधात 100 आरटीआय करतात. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्वरित अहवाल सादर करावा असे आदेश देतात. लगेच एसआरए असो, म्हाडा असो यांचे वसुली गँगचे अधिकारी कामाला लागतात", असं सोमय्या म्हणाले.