शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जानेवारी 2023 (16:11 IST)

सत्यजित तांबे : आजोबा, मामा, आई-वडिलांपासून मिळालेला काँग्रेसचा वारसा ते आमदारकीसाठी बंड

satyajit tambe
Author,नामदेव काटकर 
social media
युवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मात्र तसं अधिकृत पत्र AICC ने दिलेलं नाही. तसंच नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
 
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.
 
सत्यजित तांबे यांच्या आजवरच्या प्रवासावर एक नजर टाकूया.
 
“बाळासाहेब थोरात, माझी एक तक्रार आहे की, अशा प्रकारचे (सत्यजित तांबे) नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? आणि जास्त दिवस बाहेर ठेवू नका. आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो.”
 
नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा घोळ होण्याच्या बरोब्बर एक महिन्यापूर्वीचं देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य.
 
निमित्त होतं युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबेंनी अनुवादित केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचं. फडणवीस बोलत असताना व्यासपीठावर होते सत्यजित तांबे आणि त्यांचे मामा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात.
 
देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा जणूकाही संकेतच दिले होते आगामी अनपेक्षित अन् धक्कादायक घडामोडींचे.
 
फडणवीसांच्या या वक्तव्याला काँग्रेसनं बहुधा गंमतीनं घेतलं, पण सध्याच्या घडामोडी पाहता, ते किती सूचक होतं, हे कळून यावं.
 
खरंतर नगरच्या ज्या भागात काँग्रेसचं, पर्यायानं तांबे-थोरातांचं राजकारण फिरतं, तिथले मोठे नेते भाजपनं आधीच गळाला लावलेत. ते म्हणजे, राधाकृष्ण विखे-पाटील. असं असतानाही सत्यजित तांबेंवर फडवणीसांचा ‘डोळा’ का, हाही प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्र बनलाय.
 
सत्यजित तांबेंच्या बंडखोरीचे राजकीय अर्थ समजून घेऊच. पण तत्पूर्वी, सत्यजित तांबेंच्या राजकीय प्रवासावर ‘नजर’ टाकू. जेणेकरून फडणवीसांचा त्यांच्यावर ‘डोळा’ का आहे, याचा अंदाज येईल.
 
अमेरिकेत शिक्षण ते झेडपीचा सदस्य
महाराष्ट्रातल्या तरुण राजकारण्यांमध्ये सत्यजित तांबेंची गणती होते. येत्या 27 सप्टेंबरला ते वयाची चाळीशी पूर्ण करतील.
 
विशीपर्यंत शिक्षण पूर्ण करून, पुढचे वीस वर्षे राजकीय प्रवासही लक्षणीय आहे. अर्थात, त्यांना राजकीय वारसा आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे त्यांचे सख्खे मामा.
 
पण सत्यजित तांबेंच्या राजकारणाची सुरुवात झाली ती अहमदनगर जिल्हा परिषदेतून. ‘झेडपीचा सदस्य’ हे त्यांचं राजकारणातलं पहिलं शासकीय पद. या पदापर्यंत पोहोचण्यापूर्वी ते काँग्रेसचे सदस्य, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकरी होतेच.
 
नगरमधल्या संगमनेरमध्ये डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांच्या पोटी सत्यजित तांबेंचा 1983 साली जन्म झाला. तांबे कुटुंब अत्यंत उच्चशिक्षित. त्यांच्या आई दुर्गाबाई या स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांचे कन्या. त्यामुळे असा दणकट वारसा सत्यजित तांबेंना आहे.
 
पुणे विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर सत्यजित तांबे पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. हॉर्वर्ड केनेडी स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्र आणि राज्यशास्त्रात सत्यजित तांबेंनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि मायदेशी परतले.
 
2000 साली सत्यजित तांबेंनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला ते काँग्रेसचे सदस्य आणि नंतर भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) चे सदस्य होते. 2000 ते 2007 या काळात ते NSUI चे महाराष्ट्र सरचिटणीस होहेत.
 
मात्र, त्यांच्या खऱ्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली, ती 2007 साली. कारण या वर्षी ते अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि याच वर्षे ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीसही बनले. सत्यजित तांबेंचं यावेळी वय होतं 24 वर्षे.
 
जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी होणारे ते तरुण सदस्य ठरले होते. 2017 पर्यंत ते जिल्हा परिषदेत कार्यरत होते.
 
जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात सत्यजित तांबेंनी ‘वॉटर एटीएम’ नावाची संकल्पना राबवली होती. एक रुपयात 5 लिटर पिण्याचं शुद्ध पाणी असं या योजनेचं स्वरूप होतं.
 
सत्यजित तांबेंचं ‘सुपर’ मिशन
2007 साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनलेले सत्यजित तांबे पुढे 2011 साली प्रदेश उपाध्यक्ष बनले.
 
2018 साली झालेल्या प्रदेशाध्यक्ष निवडणुकीत त्यांनी अमित झनक आणि कुणाल राऊत यांचा पराभव केला. काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात असताना सत्यजित तांबेंच्या हातात युवक काँग्रेसची धुरा आली होती. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर त्यांच्या नेतृत्त्वाकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
 
‘सुपर 60’ आणि ‘सुपर 1000’ या त्यांच्या प्रकल्पांनी काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळानंही लक्ष वेधून घेतलं.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ‘सुपर 60’ प्रकल्प सत्यजित तांबेंनी राबवला गेला. 2014 साली काँग्रेस ज्या विधानसभा मतदारसंघात पराभूत झाली होती, त्यातील 60 मतदारसंघांत युवक काँग्रेसनं मिशन स्वरूपात काम केलं.
 
युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सरचिटणीस स्नेहल डोके-पाटील यांच्या माहितीनुसार, “हा प्रकल्प यशस्वी झाला होता. कारण या प्रकल्पाअंतर्गत युवक काँग्रेसनं निवडलेल्या जागांपैकी 28 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. अमित झनक, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख यांचे मतदारसंघही या ‘सुपर-60’ मध्ये होते.”
 
‘सुपर-1000’ हे आणखी एक मिशन सत्यजित तांबेंनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आखला होता. या मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील ज्या तरुणांना राजकारणात विविध पदांवर काम करायचं आहे, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची सोय युवक काँग्रेसनं करून दिली.
 
सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरावेळी युवक काँग्रेसच्या जवळपास 5 हजार जणांना पूरग्रस्त भागात पाठवून मदत करण्याचं काम असो वा कोव्हिड काळात वॉररूम स्थापन करून हेल्पलाईन चालवणं असो, असे उपक्रमही तांबेंनी त्यांच्या कार्यकाळात राबवले.
 
तसंच, तांबेंच्या नेतृत्त्वाच्या काळातच तृतीयपंथीय सारंग पुणेकर या युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या बनल्या. तसंच, लॉकडाऊनच्या काळात युवक काँग्रेसनं जवळपास 500 तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली होती.
 
मोदींच्या चेहऱ्याला ‘काळं’ फासणारं आंदोलन
सत्यजित तांबेंनी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ही भाजपची खेळी म्हणून सर्वत्र चर्चा सुरू झाली.
 
त्यांनंतर सत्यजित तांबेंशी संबंधित दोन गोष्टी प्रामुख्यानं सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. एक म्हणजे, ‘सिटीझनविल’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी देवेंद्र फडणवीसांनी सत्यजित तांबेंबद्दल केलेलं वक्तव्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे, सत्यजित तांबेंनी इंधनदरवाढीविरोधात केलेल्या आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेल्या बॅनरला काळं लावलं होतं, तो फोटो.
 
हा फोटो ज्या आंदोलनात काढला गेला, ते आंदोलन युवक काँग्रेसचं अध्यक्षप स्वीकारल्यानंतर काहीच दिवसात सत्यजित तांबेंच्या नेतृत्त्वात झालं होतं. इंधन दरवाढीचा निषेध करणारं हे आंदोलन होतं.
 
या आंदोलनादरम्यान एका वाहनावर चढून सत्यजित तांबेंनी मोदींचा फोटो असलेल्या बॅनरला काळं फासलं होतं.
 
मामा.. मामा... मामांचं राजकारण
‘वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्त्व हे सिद्ध करावंच लागतं’ असं वाक्य सत्यजित तांबे घराणेशाहीबाबत बोलताना कायम सांगत असतात. ट्विटरवर त्यांच्या कव्हरपेजलाही हेच विधान आहे.
 
त्यांच्या या विधानाची चिकित्सा होत राहील, मात्र सत्यजित तांबे यांना मोठा राजकीय वारसा आहे, हे सत्यच.
 
स्वत: सत्यजित तांबेंच्या तोंडी कायम एका व्यक्तीचं आदरानं नाव असतं, ते त्यांचे आजोबा भाऊसाहेब थोरात.
 
भाऊसाहेब थोरात हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी होते. त्यांनीच पुढे प्रवरेच्या काठी अमृत उद्योग समूहाची सुरुवात केली. साखर कारखानाही त्यांनी सुरू केला.
 
भाऊसाहेब थोरात हे कम्युनिस्ट विचारांचे होते. अगदी कलकत्त्यात झालेल्या कम्युनिस्ट अधिवेशनातही त्यांनी सहभाग नोंदवला होता.
 
भाऊसाहेब थोरातांनी माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्यासोबतही काम केले. अण्णासाहेब काँग्रेसचे नगरमधील नेते होते. भारतात हरितक्रांती झाली, त्यावेळी अण्णासाहेब शिंदे कृषी खात्याचे राज्यमंत्री होते. हरित क्रांतच्या प्रणेत्यांमध्ये त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं.
 
अण्णासाहेब शिंदेंच्या पत्नी हिराबाई या भाऊसाहेब थोरातांच्या भगिनी.
 
भाऊसाहेब थोरातांना दोन मुलं – बाळासाहेब आणि दुर्गाबाई.
 
दुर्गाबाईंचं लग्न डॉ. सुधीर तांबेंशी झालं. सुधीर तांबे हे काँग्रेसकडून नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते आणि आता सगळा वाद त्यांच्यावरूनच सुरू झालाय. काँग्रेसनं त्यांना निलंबितही केलंय.
 
तर दुर्गाबाई तांबे या संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा होत्या.
 
एकूणच सत्यजित तांबेंचा वारसा हा असा भरभक्कम आहे.
 
थोरात-तांबेंचं ‘अपक्ष’ कनेक्शन
काँग्रेसनं दिलेला उमेदवारी अर्ज डॉ. सुधीर तांबेंनी भरलाच नाही. मात्र, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या सत्यजित तांबेंनी ‘अपक्ष’ अर्ज दाखल केला. आता ते निवडून आल्यास ‘अपक्ष आमदार’ असतील.
 
थोरात-तांबेंच्या कुटुंबात ‘अपक्ष’ शब्दालाही इतिहास आहे.
 
महाराष्ट्र टाइम्सचे नाशिकचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे हे नाशिक-अमहदनगरसह उत्तर महारष्ट्राच्या राजकारणाचा अनेक वर्षे अभ्यास करत आले आहेत. सत्यजित तांबेंच्या ताज्या बंडावर त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘तांबेंची तिरकी चाल’ अशा मथळ्याचा लेख लिहिलाय. या लेखात शैलेंद्र तनपुरे हे थोरात-तांबे कुटुंबातील बंडाचे किस्से सांगितलेत.
 
शैलेंद्र तनपुरे पहिला किस्सा सांगतात तो बाळासाहेब थोरातांबाबत – “1985 सालच्या निवडणुकीत भाऊसाहेब थोरात आणि तत्कालीन मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्यात उमेदवारीसाठी चांगलाच संघर्ष झाला. दोघांनाही दुखावणं काँग्रेसश्रेष्ठींना अवघड होते. शेवटी दोघांनाही टाळून पुणे येथील शकुंतला थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली.
 
“थोरात या नावाचा लाभ घेण्याची पक्षाची चाल होती, हे त्यातून स्पष्ट होत होतेच, पण भाऊसाहेब थोरात माघारी फिरायला तयार नव्हते. शिवाय आपल्याच पक्षाविरोधात बंड करणे त्यांच्या मनाला पटत नव्हते. म्हणून तेव्हा त्यांनी आपले चिरंजीव बाळासाहेब यांना अपक्ष उभे केले. ते निवडून आले, लागलीच पक्षातही परत आले आणि काळाच्या ओघात सर्वेसर्वाही झाले.”
 
असाच किस्सा डॉ. सुधीर तांबेंबाबतही शैलेंद्र तनपुरे सांगतात – “थोरातांसारखीच घटना सुधीर तांबे यांच्याही राजकीय कारकिर्दीच्या शुभारंभाला घडली. भाजपचे प्रतापदादा सोनवणे लोकसभेवर निवडून गेल्याने, त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला. तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने अॅड. नितीन ठाकरेंना, तर भाजपने प्रसाद हिरेंना उमेदवारी दिली होती. तेव्हा डॉ. सुधीर तांबे यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती.
 
“थोरातांनी प्रचंड प्रयत्नही केले, पण शरद पवारांमुळे ते शक्य झाले नाही. तिरंगी लढतीत अपक्ष सुधीर तांबेंनी बाजी मारली. नंतर ते काँग्रेसमध्ये आपसूकच परतले.
 
“पुढे नंतरच्या दोन्ही निवडणुका त्यांनी आरामात जिंकल्या. प्रा. ना. स. फरांदे व नंतर प्रतापदादा सोनवणे यांच्यामुळे नावारूपाला आलेला हा मतदारसंघ त्यामुळेच भाजपचा बालेकिल्ला समजला जायचा. पण तांबेंमुळे ही कोंडी फुटली आणि नंतर तर तांबेंना पराभूत करणे शक्य नाही इथपर्यंत तांबेंनी नावलौकिक मिळविला.”
 
सत्यजित तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उतरल्यानं प्रदेश काँग्रेसमधला गोंधळ समोर आलाच आहे. मात्र, निवडणुकीच्या निकालापर्यंत आणि निकालानंतरही या घडामोडी काय वळणं घेतात आणि सत्यजित तांबेंचा अंतिम थांबा पुन्हा ‘काँग्रेस’च असेल की ‘भाजप’ असेल, हे पाहणं आता येणारा काळच ठरवेल.
 
शेवटी एक महत्त्वाचं की – भाच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घुसळण होत असताना, बाळासाहेब थोरातांची एकही प्रतिक्रिया अद्याप आली नाही. मॉर्निंग वॉकदरम्यान घसरून पडल्यानंतर त्यांना दुखापत झाल्यानं ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
Published By -Smita Joshi