मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (16:15 IST)

शिवसेनेला मच्छीमार बांधवांचा विसर पडला : दरेकर

तौक्ते वादळात महाविकास आघाडी सरकारने मदतीची घोषणा केली, पण अद्यापही मदत केलेली नाही. मत्स्य व्यवसायाला मत्स्यशेती म्हणून व मच्छीमार ‘शेतकरी’ म्हणून मान्यता दिल्यास त्यांना पीक कर्ज व शेतकऱ्यांच्या सुविधा, सवलती मिळतील. मच्छीमारांना दिलासा मिळेल, यादृष्टीने राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
 
यावेळी प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली. “मच्छीमार समाजाने नहेमीच शिवसेनेला निवडणुकांमध्ये भरभरून मतं दिली. या समाजाने शिवसेनेच्या पालख्या वाहिल्या. मात्र शिवसेनेने याच कोळी बांधवांना वाऱ्यावर सोडले. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेला मच्छीमार बांधवांचा विसर पडला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आजही मच्छीमारांना मदत मिळत नाही, त्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत यासारखे दुर्दैव नाही,” असे दरेकर म्हणाले.
 
तौक्ते चक्रिवादळाचा फटका बसलेल्या पालघर जिल्ह्यातील कोळीबांधवाना पुन्हा उभे करण्यासाठी कोळी महासंघाचे अध्यक्ष व भाजप आमदार रमेश पाटील यांच्या पुढाकाराने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेकांना आर्थिक मदत, सातपाटी गावाकरिता रुग्णवाहिका, एडवण गावाकरिता कुपनलिकांसाठी निधीचे वाटप करण्यात आले.